पितृपक्षात बिहारची गया फुलते श्रद्धाळूंच्या गर्दीने

gaya
बिहारमधील गया हे एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे. या शहराच्या अनेक ओळखी आहेत. गुलाबबाई व जद्दनबाईंसारख्या नामवंत गुणी गायिका देशाला देणारी ही नगरी. येथून जवळच असलेले ईश्वरपूर ही कलाकारांची पंढरी तर दगडातून सुंदर मूर्ती कोरणार्‍या पाथरवटांचे हे स्थान. पितळी वस्तूंचा महाप्रचंड व आगळावेगळा बाजार असलेले कनेर. भारताचे मँचेस्टर अशी ओळख निर्माण केलेले मानपूर, भगवान गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली ती बोधगया, विष्णुपदाचे जगप्रसिद्ध मंदिर अशी अनेक स्थळे असलेले हे शहर.

सध्या सुरू असलेल्या पितृपक्षात तर या गयेचे महत्त्व फारच मोठे. देशविदेशातील भारतीय आपल्या पितरांना सद्गती मिळावी यासाठी या पंधरवड्यात येथे येऊन त्यांना तर्पण करतात व श्राद्धे करतात. त्यामुळे या पंधरा दिवसांच्या काळात गयेतील सर्व लहान मोठी हॉटेल्स, धर्मशाळा हाऊसफुल्ल असतात. अनेक ठिकाणी घराघरातूनही श्राद्धासाठी आलेल्या लोकांची व्यवस्था केली जाते. हॉटेल धर्मशाळांवर रूम्स शिल्लक नाही असे बोर्ड झळकतात. या पंधरा दिवसांत या शहरात सरासरी २०० कोटींची उलाढाल होते व साधारण ५ लाख भाविक पितरांच्या श्राद्ध, तर्पणासाठी येथे येतात.

या काळात तीळ, कणीक, श्राद्धासाठी लागणारी पूजा सामग्री, फळे, फले, साड्या ,धोतरे, गमछे, मिष्टान्ने, मातीचे घट, भांडी अशा अनेक वस्तूंची दुकाने अक्षरशः पावलापावलावर असतात व सर्वत्र खरेदीसाठी गर्दी असते. येथील विष्णुपद मंदिराजवळ फाल्गू नदीत पिंडदान व तर्पण केल्याने पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो असा विश्वास आहे. यामुळेच गया ही मोक्षमार्गावरची महत्त्वाची गल्ली मानली जाते. अर्थात गर्दी प्रचंड असली तरी दरवर्षीच या काळात शहराची स्वच्छता, पाणी, वीज पुरवठा, वाहतूक याची उत्तम व्यवस्था येथे राखली जाते.

पितृपक्ष हा अन्य शुभकार्यासाठी अशुभ मानला जात असला तरी हा पंधरवडा गयावासियांना मात्र दिवाळी सारखाच असतो कारण या पंधरा दिवसांत त्यांची वर्षभराची कमाई होऊ शकते. या काळात कायम बेरोजगार असलेल्या व्यक्तीही चांगली कमाई करू शकतात त्यामुळे गया वासी वर्षभर या पंधरवड्याची प्रतीक्षा करत असतात.

Leave a Comment