उरी हल्यामुळे यंदा व्यापार मेळ्यात पाकिस्तानचा स्टॉल नाही

alishan
काश्मीरमधील उरी या लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्लयामुळे भारत व पाकिस्तानातील संबंध तणावपूर्ण बनल्याने दिल्लीत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भरणार्‍या व्यापारी मेळ्यात पाकिस्तानचा स्टॉल लावला जाणार नाही असे पाकिस्तान ट्रेड डेव्हलपमेंट अॅथोरिटीने जाहीर केले आहे. या व्यापारी प्रदर्शनात आत्तापर्यंत दोन वेळा पाकिस्तानने त्यांचे स्टॉल लावले होते. अलिशान पाकिस्तान अशा नावाने हे स्टॉल लावले जातात. २०१२ व १४ साली असे स्टॉल लावले गेले होते. दोन्ही देशातील व्यापारी संबंध वाढावेत व द्विपक्षीय व्यापाराला गती मिळावी यासाठी हा उपक्रम राबविला जात होता.

पाकिस्तानच्या ट्रेड अॅथॉरिटीने यंदा उरी हल्ला प्रकरणामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले असल्याने यंदाच्या प्रदर्शनात सहभागी होणे रद्द केले असल्याचे जाहीर केले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने दोन्ही देशातील व्यापारी व ग्राहक एकाच प्लॅटफॉर्मवर येऊ शकतात. जुलै ते मे या काळात भारत व पाकमध्ये २०६ अब्जांचा द्विपक्षीय व्यापार झाला असून त्यात ४२ अब्जांची निर्यात पाकने भारताला केली तर भारताने पाकला १६४ अब्ज रूपयांचा माल निर्यात केला होता असेही समजते.

Leave a Comment