सरकार आणि आरक्षण

maratha-kranti
सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मोर्चे हा एकमेव मोठा चर्चेचा विषय झालेला आहे. हे मोर्चे अभूतपूर्व आहेत आणि त्यांना जमणारी गर्दी डोळे फिरवणारी आहे. एकेका जिल्ह्यात निघालेल्यात मोर्चात त्या जिल्ह्यातल्या मराठा समाज झाडून जमा झालेला दिसतो. हे मोर्चे हे मूकमोर्चे आहेत. त्यामुळेही त्यांचे कौतुक होत आहे आणि मोर्चात दिसणारा संयम हा कुणीही आदर्श घ्यावा असा आहे. अशा प्रकारचा विराट मोर्चा काढणे हा लोकशाहीतला आपला आवाज बुलंद करण्याचा मार्ग आहे हे नक्कीच. एकेका जिल्ह्यातील मोर्चे चर्चेचा विषय होत असल्यामुळे नव्या नव्या जिल्ह्यात मराठा समाजातल्या सर्वसामान्य माणसाला मोर्चात सामील होण्याची प्रेरणा मिळत आहे. अशा प्रकारचा मोर्चा मुंबईतही निघावा असा प्रयत्न जारी आहे. तसा तो निघाला तर महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात गर्दीच्या बाबतीत अभूतपूर्व ठरणार आहे यात काही शंका नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये लोकांच्या मनात अशी भावना निर्माण झाली होती की लोकशाहीतले सरकार आरडाओरडा केल्याशिवाय आणि हिंसाचार केल्याशिवाय मागण्या मान्य करत नाही. दोन-चार बस जाळल्याशिवाय सरकार कोणाच्या मागण्यांना भीकच घालत नाही. असे अनुभवानंतर लोकांना पटायला लागले होते.

अशा वातावरणात मराठा समाजाच्या मोर्चातला संयम आणि शांतता ही वाखाणण्याजोगी आहे. मात्र या मोर्चातून पुढे आलेल्या मागण्या आणि त्या मान्य होण्याची शक्यता या विषयी वास्तविक या ठिकाणी काही म्हणायचे नाही परंतु आपण मोर्चे मोठे काढले म्हणून सरकारने मागण्या मान्य केल्या पाहिजेत असा एक भाव या मोर्चातून प्रकट होताना दिसत आहे. म्हणूनच मोर्चे किती मोठे निघाले यावरच अधिक भर दिला जात आहे. खरे म्हणजे मराठा समाज हा महाराष्ट्रातला संख्येने सर्वाधिक असलेला समाज आहे आणि या समाजाच्या भावनांना धक्का पोहोचवणार्‍या काही घटना अलीकडच्या काळात एकदमच घडल्या आहेत. या दोन कारणांनी मोर्चे भव्य संख्येने निघत आहेत. या प्रचंड गर्दीतला प्रत्येक मराठा कोणा एका विशिष्ट मागणीसाठी प्रेरित झालेला नाही. चार-पाच मागण्यांचा जोर एकदम वाढला आहे आणि काही घटनांमुळे तो जोर अधिक तीव्र झाला आहे. या सर्व मोर्चामधली सर्वात प्रभावी भावना ही नैराश्याची आहे. महाराष्ट्रामध्ये आजवर दोन-तीन अपवाद वगळता सगळे मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले आहेत. मराठा समाजाच्या हातातच सत्तेची सूत्रे आहेत. शिवाय सहकारी संस्था, शिक्षण संस्था आणि साखर कारखाने ही सारी शक्ती केंद्रे त्यांच्याच हातात आहेत. असे असतानाही समाजाची म्हणावी तशी प्रगती का होत नाही ही सर्व साधारण तीव्र भावना मराठा समाजातील तरुणांच्या आणि तरुणींच्या मनामध्ये आहे.

या एकाच मध्यवर्ती भावनेच्या संदर्भात मराठा समाजातील युवक-युवतींना काही सांगावेसे वाटते. कारण समाजाची प्रगती होत नाही ही त्यांची भावना स्वागतार्ह आहे. कोणतीही व्यक्ती असो की समाज असो त्याला आपली प्रगती का होत नाही असा प्रश्‍न पडला पाहिजे. तसा प्रश्‍न पडणे हेच प्रगतीचे पहिले लक्षण आहे. मात्र आपली प्रगती होत नाही ही भावना केवळ पुरेशी नाही. प्रगती करण्याचे योग्य मार्ग सुचणे हे आवश्यक आहे. आपल्या देशात गेल्या ७५ वर्षात आपल्या नेत्यांनी लोकांना प्रगतीचे खरे मार्ग दाखवलेच नाहीत. सुरूवातीच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळाले की प्रगती होईल असे सांगितले गेले आणि स्वातंत्र्य मिळणे हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे भासवले गेले. मात्र पहिल्या काही वर्षातच केवळ स्वातंत्र्य मिळाल्याने प्रगती होत नाही हे लोकांच्या लक्षात यायला लागले. त्यानंतर आमच्या नेत्यांनी समाजवादाने सारे प्रश्‍न सुटतील असे एका बाजूला भासवले तर दुसर्‍या विचाराच्या लोकांनी हिंदुत्ववाद हीच सारे प्रश्‍न सोडवण्याची गुरुकिल्ली आहे असे सांगून लोकांना भ्रमित केले.

या मार्गांचे आणि गुरुकिल्ल्यांचे आपापल्या परीने सामर्थ्य आहे. पण तोच एक मार्ग पुरेसा आहे आणि दुसरे काही करण्याची गरजच नाही ही लोकांची भावना झाली. अशी एकेक गुरुकिल्ली फसत गेली. समाजवाद निरुपयोगी ठरला असे लोकांना लक्षात आले तेव्हा पुढार्‍यांनी आता समाजवाद सोडून भांडवलशाहीचा स्वीकार केला की सारे काही छान होईल असे सांगायला सुरूवात केली. काही पुढार्‍यांनी आरक्षण हाच प्रगतीचा रामबाण उपाय आहे असे सांगितले तर काही पुढार्‍यांनी ऍट्रॉसिटीचा ऍक्ट रद्द होणे हाच सगळ्या दुःखावरचा इलाज आहे असे सांगायला सुरूवात केली. खरे म्हणजे समाजाची प्रगती करण्यासाठी या मार्गांचा अवलंब करावा लागतो पण यातला कोणताही एक मार्ग हा गुरुकिल्ली म्हणून उपयोगाचा आहे असे म्हणणे चुकीचे असते. मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये सहभागी होणार्‍या तरुणांच्या मनात साधारण अशीच भावना निर्माण झाली आहे. आपल्या समाजाला आरक्षण मिळाले की आपली भराभर प्रगती होईल असे त्यांना वाटायला लागले आहे. मात्र काही वर्षांनी त्यांना याही गोष्टीतली व्यर्थता लक्षात येईल. म्हणून पुढचा हा धोका टाळण्यासाठी समाजाला हे सांगावे लागेल की कठोर परिश्रमाशिवाय प्रगती होत नाही. जगात आज ज्यांनी प्रगती केली आहे त्या सगळ्यांच्या परिश्रमाकडे पाहून परिश्रमाचा मार्ग हाच रामबाण इलाज असतो असे दिसते आणि तसेच लोकांना सांगावे लागेल. केवळ मराठा समाजातल्याच नव्हे तर सगळ्याच लोकांच्या गळी ही कडू गोळी उतरवावी लागणार आहे.

Leave a Comment