सैनिकांना सावध करणारी चिप होतेय तयार

drdo
भविष्यात सैन्यातील जवानांवर अचानक हल्ले झालेच तरी त्यापासून सैनिकांचे रक्षण करू शकेल अशी चिप रक्षा मंत्रालयाच्या अ्रखत्यारीखाली काम करणार्‍या डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑरगनायझेशन म्हणजे डीआरडीओमध्ये विकसित केली जात आहे. या चिपवरचे संशोधन वेगाने सुरू असून ती लवकरच सैन्यासाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

या चिपमुळे सैनिकांना त्यांच्या आसपास सुरू असलेल्या हालचाली अगोदरच कळू शकणार आहेत. ही चिप कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याची पूर्वसूचना देईल व त्यामुळे हल्ला परतविण्यासाठी सज्ज होण्यास जवानांना पुरेसा अवधी मिळू शकेल. एकप्रकारे ही चिप सैनिकांसाठी सुरक्षा कवच असेल. दुर्गम भागात तैनात असणार्‍या जवानांसाठी ही चिप हवामान बदलाची माहिती देईल तसेच बिघडलेल्या वातावरणात कोणता रस्ता सुरक्षित आहे याची माहितीही देईल. सैनिकांच्या आसपास कोणतीही हालचाल होत असेल तर त्याची सूचना ही चिप अगोदरच देईल.

गेल्या १५ वर्षात लष्करी तळांवर तसेच जवानांवर अनेक आंतकी हल्ले झाले आहेत. यात अनेक जवानांचे बळी गेले आहेत. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार जवानांसाठी सुरक्षा जॅकेट व अन्य उपकरणे दिलेली असतातच मात्र बेसावध असताना किवा झोपेत असताना अथवा आराम करत असताना अचानक हल्ला झाला तर या साधनांचा फारसा उपयोग होत नाही. नव्या चिपमुळे ज्या भागात जवान आहेत, त्या परिसरात बर्‍यापैकी दूर अंतरावरील हालचालींची माहिती व संकेत जवानांना मिळणार आहेत. चिपचे कव्हरेज बर्‍यापैकी दूर अंतरासाठी असल्याने जवानांना सावध होऊन आपली पोझिशन घेण्याइतका वेळ मिळू शकणार आहे. ही चिप दहशतवादी अथवा शत्रू टापूत येताच त्यांचे संकेत देऊ शकणार आहे.

Leave a Comment