मुस्लीम देशातील दुर्गेचे प्राचीन मंदिर

durga1
अझरबैजान या ९५ टक्के मुस्लीम जनता असलेल्या देशात ३०० वर्षांहूनही अधिक प्राचीन असे दुर्गा मातेचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे येथे अखंड ज्योती आहे व दरवर्षी येथे साधारण १५ हजारांहून अधिक भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. येथे तेवत असलेल्या अखंड ज्योतीमुळे त्याला टेंपल ऑफ फायर असेही संबोधले जाते.

हिंदू धर्मात अग्नी पवित्र व पूजनीय मानला गेला आहे व अग्नीचे वेगळेच महत्त्वही आहे. त्यामुळे या दुर्गा मंदिरात तेवणारी ज्योती साक्षात भगवती असल्याची भावना भक्तगणांत आहे. या मंदिरात प्राचीन त्रिशूळही आहे. मंदिराच्या भितींवर गुरुमुखी भाषेतील लेख आहेत. या मंदिराची वास्तुकलाही प्राचीन आहे. शेकडो वर्षांपूवी या मार्गाचा वापर भारतीय व्यापारी करत असत व त्यापैकीच कोणीतरी हे मंदिर बांधले असावे असे सांगितले जाते. मात्र इतिहास असे सांगतो हरियाणातील मानदा गावाचे बुद्धदेव यांनी हे मंदिर उभारले. मंदिरात असलेल्या शिलालेखात उत्तमचंद व शोभराज यांनीही या मंदिर उभारणीत योगदान दिले असल्याचे उल्लेख आहेत. या मार्गाचा वापर करणारे व्यापारी येथे दर्शनासाठी थांबत असत व जवळच असलेल्या ओवर्‍यात आराम करून पुढे जात असत असे सांगितले जाते.

durga
इराणमधूनही कांही लोक येथे पुजा करण्यासाठी येत असत. येथे कायमस्वरूपी पुजारी होते मात्र ते १८६० सालापासून येथून निघून गेले त्यानंतर कोणीही पुजारी येथे वास्तव्यास आलेले नाहीत. अझरबैजान सरकारने १९७५ साली या मंदिराचे स्मारक बनविले व १९९८ मध्ये युनेस्कोला हे जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर करण्यासाठी त्याचे नामांकन पाठविले.२००७ साली ही ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केली गेली आहे.

Leave a Comment