देशामधील ४७५ व्यक्तींची कर बुडविणाऱ्या देशांमध्ये गुंतवणूक

bahamas
नवी दिल्ली – बहामाज् पेपर लीक्स द्वारे देशामधील तसेच भारतीय वंशाच्या ४७५ व्यक्तींनी कर बुडविणाऱ्या देशांमध्ये गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

या यादीमध्ये वेदांता समुहाच्या अनिल अग्रवाल, बॅरन समुहाच्या कबीर मूलचंदानी आणि फॅशन टीव्हीचे प्रमोटर अमन गुप्ता यांची नावे असल्याचे इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. बहामाज् पेपर लीक्सच्या या यादीमध्ये जगभरातील एकूण १ लाख ७५ हजार जणांची नावे आहे. बहामाज्मध्ये जर गुंतवणूक केली तर तिथे कर लागत नाही तसेच तुमचे नावही गुप्त ठेवता येते. त्यामुळेच अनेक गुंतवणूकदारांची पसंती या टॅक्स हॅवन्समध्ये गुंतवणूक करण्याला आहे.

अनिल अग्रवाल यांचे नाव या यादीमध्ये आल्यानंतर अग्रवाल यांच्या प्रवक्त्यांनी त्याचा खुलासा केला आहे. अग्रवाल यांच्या नावावर एक ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने जी काही गुंतवणूक केली आहे त्याची माहिती आयकर विभागाला दिली आहे असे प्रवक्त्यांनी म्हटले आहे. या यादीमध्ये प्रसाद आणि प्रकाश निम्मागड्डा या फार्मासिटिकल्स क्षेत्राशी निगडित विकसकाचेही नाव आहे, गौतम थडानी, राजन मधू, गणपती रथिनाम, शौमिक प्रसन्ना मुखर्जी यांची नावे देखील या यादीमध्ये आहे. आपण काही बेकायदेशीर कृत्य केले नसल्याचा खुलासा त्यांनी वृत्तपत्राला केला आहे.

Leave a Comment