बीएसएनएल देखील देणार फ्री व्हॉइस कॉलिंग सेवा

bsnl
मुंबई – सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली असून बीएसएनएलनेही जिओ प्रमाणे आपल्या ग्राहकांना फ्री वॉइस कॉलिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या एका अधिका-याने याबाबत माहिती दिली.

दरम्यान रिलायन्स जिओची ऑफर फक्त ४जी ग्राहकांसाठी असून बीएसएनएल २जी आणि ३जी ग्राहकांसाठी फ्री कॉलिंगची ऑफर घेऊन येणार आहे. देशात २जी आणि २जीच्या ग्राहकांची संख्या खूप जास्त असल्यामुळे बीएसएनएल ४जी पेक्षा २जी आणि ३जी ग्राहकांवर लक्ष्य केंद्रित करत आहे. रिलायन्स जिओपेक्षा बीएसएनएलची ही ऑफर स्वस्त असणार आहे. जिओच्या सगळ्यात स्वस्तातल्या प्लॅनसाठी १४९ रूपये खर्च करावे लागतात. बीएसएनएलचा प्लॅन त्याहून स्वस्त असणार आहे. जिओ ठरावीक कालावधीसाठी फ्री ऑफर देत आहे, तर बीएसएनएल लाइफटाइम फ्री ऑफर देणार आहे. मात्र, ग्राहकांना यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. पुढील वर्षी जानेवारीपासून बीएसएनएल ही सेवा सुरू करण्याची शक्यता असून मुंबई आणि दिल्ली वगळता इतर शहरांतील टेलिकॉम मार्केट्समध्ये बीएसएनएलची चांगली पकड आहे. त्यामुळे एअरटेल, वोडाफोन आणि आयडियासारख्या कंपन्यांवर आता आणखी दबाव वाढणार आहे.

Leave a Comment