डोसावालाच्या गाडीवर आयकर विभागाची धाड

dosa
मुंबई – तुम्ही आजपर्यंत आयकर विभागाने कर न भरणा-या करोडपती किंवा लखपतींच्या घरावर छापे टाकल्याचे ऐकले असेल. पण आता चक्क रस्त्यावर डोसा विकणा-या गाडीवर आयकर विभागने छापा टाकला आहे.

आयकर विभागाने मुंबईतील घाटकोपर येथे असलेल्या खाऊ गल्लीत ‘साई स्वाद’ डोसावालाच्या गाडीवर धाड टाकून ६० हजार रुपये जप्त केले आहेत. मागील ८ दिवसांपासून आयकर विभागाने ‘साई स्वाद’ डोसावालाच्या स्टॉलवर पाळत ठेवली आणि त्यानंतर नवव्या दिवशी धाड टाकली. घाटकोपरमधील खाऊ गल्लीत विजय रेड्डी यांचा ‘साई स्वाद’ नावाचा स्टॉल लावतात. या ठिकाणी तब्बल ४५ प्रकारचे डोसे मिळतात. हा डोसा ७० रुपयांपासून १६० रुपयांना मिळतो. डोसा अगदी चविष्ट असतो त्यामुळे नागरिकांची येथे तुफान गर्दी असल्याचे पहायला मिळते.

आयकर अधिका-यांना विजय रेड्डींची कमाई आणि त्यांनी जाहीर केलेले उत्पन्न याबाबत संशय होता. त्यामुळे आयकर विभागाने त्यांच्यावर पाळत ठेवली आणि धाड टाकली. आयकर विभागने ज्यावेळी धाड टाकली तेव्हा गल्ल्यात फक्त ६० हजार रुपयेच मिळाले. या पैशांपैकी काही पैसे हे आपल्या मित्रांचे असल्याचा दावा विजय रेड्डी यांनी केला आहे.

Leave a Comment