टेकसॅव्हींना भासतेय डिजिटल ब्रेकची गरज

detox
स्मार्टफोन, सोशल मिडीया, इंटरनेट ही आजच्या जीवनाची त्रिसूत्री बनली आहे व या सार्‍या सुविधा आवश्यकही आहेत याबद्दल वाद नाही. मात्र रात्रंदिवस यातच गुंतून राहिलेल्या टेकसॅव्हींना आता यापासून थोडा ब्रेक घेणे हे आवश्यक वाटू लागले आहे. सतत कामाने पिचलेल्या शरीरात टॉक्सिक्स साठतात व शरीराचे डिर्टाक्सिफिकेशन करण्यासाठी कामापासून विश्रांती घेतली जाते तशीच विश्रांती डिजिटल कामांमुळे केवळ शरीरालाच नाही तर मनालाही हवी याबाबत आता अनेकांचे एकमत झाले आहे व त्यामुळेच डिजिटल ब्रेक किंवा डिजिटल डिटॉक्सिफिकेशन म्हणजे फोन, इंटरनेट, सोशल मिडिया पासून काही दिवसांसाठी दूर राहण्यावर सर्वसामान्य टेकसेव्हींपासून ते अगदी तज्ञ, सेलिब्रिटीही भर देऊ लागले आहेत.

दिवसातले १८-१८ तास ऑनलाईन राहण्यामुळे होत असलेले दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. परिणामी मायाजाल हवेच पण त्याचा दुष्परिणाम कमी व्हावा यासाठी असे डिजिटल ब्रेक घेण्यास अनेकजण पसंती देत आहेत व त्याचे चांगले रिझल्टही मिळत आहेत. आजकाल रात्री डोळे मिटेपर्यंत स्मार्टफोन व झोपेतून उठताच सर्वप्रथम स्मार्टफोन ही लाईफ स्टाईल बनली आहे. त्यामुळे स्मार्टफोन शिवाय राहणे अशक्य बनते आहे तरीही हा डिजिटल ब्रेक नक्कीच नवी उर्जा देतो आहे असा अनुभव लोकांना येत आहे.

इंटरनेटचा वापर थांबविणे अशक्य असले तरी त्यातून ब्रेक घेता येतो असे हा अनुभव घेतलेले सांगत आहेत. आपण डिजिटल ब्रेक घेत असल्याचे आधीच सोशल मिडीयावर जाहीर करण्याकडेही प्रवृत्ती वाढते आहे. या काळात भटकंती, आवडीच्या छंदासाठी वेळ, आरोग्यासाठी वेळ असे उपक्रम आखले जात आहेत. डिजिटल ब्रेकमुळे कामाचा झपाटा वाढण्यास, नातेसंबंध सुधारण्यास व मानसिक स्थैर्य मिळविण्यास फारच मदत होत असल्याचे सेलिब्रिटीही सांगत आहेत.

Leave a Comment