आयफोन सेव्हनमधून नागाच्या फुत्कारासारखे आवाज

noise
आयफोन सेव्हन ची दोन्ही व्हर्जन खरेदी करणार्‍या कांही ग्राहकांनी या फोनमधून नागाच्या फुत्कारासारखे विचित्र आवाज येत असल्याच्या तक्रारी अॅपल केअरकडे केल्या असल्याचे समजते. एका रिपोर्टनुसार हे आवाज अॅपलच्या ए १० फ्यूजन प्रोसेसरमुळे निर्माण होत असावेत.

स्टीफन हॅकेट यांनी या संदर्भातली तक्रार सर्वप्रथम नोंदविली असून त्यांनी यूट्यूबवर व्हिडीओ लिंक पोस्ट केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार फोनमधून फारच त्रासदायक आवाज येत आहेत. अॅपलचे माजी पी आर डॅरल इथरिंगटन यांनीही अॅपलचा नवा कोरा आयफोन घेतला मात्र त्यातून नागाच्या फुत्कारासारखे आवाज येत आहेत अशी तक्रार दिली आहे. अॅपलकडून या संदर्भात अजून कोणताच खुलासा केला गेलेला नाही मात्र अॅपल केअरने डॅरल यांना तुमचा फोन रिप्लेस करून दिला जाईल असे कळविले आहे.

अॅपलच्या नव्या प्रोसेसरमुळेच ही आवाजाची समस्या येत असल्याचे तज्ञांचेही म्हणणे आहे. सुरवातीच्या लॉटमध्ये कांही गडबड झाली असावी असेही सांगितले जात आहे. मात्र लाईफ हॅकरच्या म्हणण्यानुसार ही तक्रार दूर करण्याचा सध्या तरी कोणताही मार्ग नाही कारण हे फोन पूर्णपणे सील्ड आहेत. त्यामुळे त्याची रिप्लेसमेंट देणे एवढाच एक मार्ग सध्या उपलब्ध आहे. सध्या मागणीच्या मानाने पुरवठा कमी असल्याने ज्यांनी अशा तक्रारी केल्या आहेत त्यांना रिप्लेसमेंट मिळण्यासाठी कांही काळ प्रतीक्षा करावी लागेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment