आंध्रप्रदेशात सध्या सर्वाधिक लोकप्रिय बाबा असलेले योगगुरू रामदेवबाबा यांनी आंध्राला देशातील पतंजली उद्योगाचा उत्तराखंडनंतरचा दोन नंबरचा बेस बनविण्याची योजना आखली असून आंध्र सरकारने त्यांना नायडूपेटा येथे २०० एकर जमीन दिली असल्याचे समजते. या प्रकल्पात पतंजलीच्या अन्य उत्पादनांसोबतच स्वदेशी जीन्सचेही उत्पादन केले जाणार आहे.
आंध्राला रामदेवबाबांचा तर रामदेवबाबांना तिरूपतीचा मदतीचा हात
आंध्रातील नायडू सरकार आणि रामदेवबाबा हे सध्या फारच एकमेकांच्या प्रेमात आहेत. याचे कारण म्हणजे फक्त आंध्रातच उत्पादन होणारे रक्तचंदन परदेशात निर्यात करून त्यातून आंध्राची नवी राजधानी अमरावती बांधायचा चंद्राबाबू नायडू यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र वनविभागाने रामदेवबाबा व चंद्राबाबूंची गाठभेट घालून दिल्यावर हे रक्तचंदन रामदेवबाबांच्या पतंजलीने एकहाती खरेदी केले. ७०६ मेट्रीक टनाच्या या रक्तचंदनाचा वापर पतंजलीच्या औषधांत तसेच उदबत्तीसाठी केला जाणार आहे. त्यामुळे आंध्र सरकारला बाबा रामदेवांनी चांगलाच हात दिला असून ते ऐनवेळी त्यांच्या मदतीला धावून आले असल्याची भरपाई केली जाणार आहे.
आंध्रात बाबा रामदेवांनी धार्मिक, आरोग्य व योग पर्यटनासाठी सहाय्य करावे अशी विनंती चंद्राबाबूंनी केली असून योगा व्हिलेज उभारण्याची परवानगी सर्वप्रथम रामदेवबाबांना दिली आहे असेही समजते. आंध्रातील जगप्रसिद्ध तिरूपती येथे त्यासाठी योग्य जमिनीचा शोध घेतला जात असून तिरूमला तिरूपती देवस्थानम च्या सहकार्याने रामदेवबाबा येथे नॅचरोपथी व गोशाला उभारणार आहेत असेही समजते.