आता ‘मोबाईल अॅप’ने करा ‘एसटी’चे आरक्षण

state-transport
मुंबई- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आरक्षणासाठी मोबाईल अॅप कार्यान्वित केले असून एसटीने हे अॅप ‘ईटीआयएम-ओआरएस‘ या प्रकल्पांतर्गत कार्यान्वित केले आहे. त्यामुळे प्रवाशांना आता घरबसल्या मोबाईलवरून एसटीचे आरक्षण करता येईल.

महामंडळ विमान कंपन्या आणि रेल्वेकडून मिळणाऱ्या सुविधांनुसार एसटीच्या प्रवाशांनाही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देत आहे. या अॅपचा लाभ अँड्रॉइड मोबाईलधारकांना घेता येणार आहे. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरमधून एमएसआरटीसी मोबाईल रिझर्व्हेशन अॅप डाउनलोड करून लॉग इन करावे लागणार आहे. यानंतर प्रवाशांना तिकिटाच्या आगाऊ आरक्षणासाठी नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंटची सुविधा अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या अॅपद्वारे प्रवाशांना त्यांच्या सोयीचा आसन क्रमांक, बससेवा प्रकार, बसफेरीची वेळ, चढण्या-उतरण्याचे ठिकाण या बाबी निवडता येणार आहेत. एसटीच्या प्रवाशांना यापूर्वी महामंडळातर्फे मोबाईलवरून एक एसएमएस करून अवघ्या तीन मिनिटांत आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या रांगांपासून प्रवाशांची सुटका झाली आहे. मोबाईलधारकांना ५४९५९ या क्रमांकावर एसएमएस करून आरक्षण करता येते.

Leave a Comment