मोजाम्बिकनंतर ब्राझीलमधून होणार डाळींची आयात

dal
नवी दिल्ली: डाळींच्या महागाईने त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी मोजम्बिकमधून डाळी आयात केल्यानंतर आता ब्राझीलमधून डाळी आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे भारताला अविरत डाळीचा पुरवठा करण्यासाठी ब्राझिलमध्ये भारतीय वाणांच्या द्विदल धान्याची लागवड करण्याची तयारीही ब्राझीलने दर्शविली आहे.

सन २०१५-१६ मध्ये देशभरात २४६ लाख टन डाळींची मागणी होती. मात्र देशांतर्गत उत्पादन केवळ १६४ लाख टन झाले. त्यामुळे देशात निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या नागरी पुरवठा मंत्रालयाने ५८ लाख टन डाळींची आयात केली. मात्र २४ लाख टनांचा तुटवडा कायम असल्याने डाळींचे भाव अद्याप वाढत आहेत. बाजारपेठेत मागील दोन आठवड्यात हरभरा डाळीच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यापुढील काळात डाळींची कमतरता भरून काढण्यासाठी ब्राझीलकडून डाळी आयात करण्याची तयारी केंद्राने केली आहे. ब्राझीलच्या मोठ्या भूभागातील वातावरण आणि जमिनीचा पोत भारतीय वातावरण आणि मातीशी जुळणारे असल्याने त्या ठिकाणी द्विदल धान्यांची लागवड करण्यास ब्राझील उत्सुक असून प्रायोगिक तत्वावर लागवड करण्यासाठी ब्राझीलने भारतीय वाणे मागविली आहेत.

डाळींचा तुटवडा कायम स्वरूपी संपविण्यासाठी उपाययोजना सुचविणाऱ्या सुब्रमण्यम समितीने आपला अहवाल अर्थमंत्री अरुण जेटली यांना सोपविला आहे. या अहवालात डाळींच्या उत्पादनात आमूलाग्र बदल करण्याची शिफारस समितीने केली आहे. त्यामध्ये हरभरा डाळींचे किमान हमीभाव ४ हजार रुपयांपर्यंत वाढविण्याची; तसेच खरिपातील उडीद आणि तूर डाळींचे हमीभाव ६ हजार रुपये करण्याची शिफारस करण्यात आली आहे. डाळीचे उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक जैवतंत्रज्ञानाच्या आधारे द्विदल धान्यांची सुधारीत वाणे विकसित करण्याची सूचनाही समितीने केली आहे.

Leave a Comment