नववी नापास मुलाने बनविला भंगारातून संगणक

jayant
मुंबई: घाटकोपर येथे राहणारा जयंत हा नववीत नापास झालेला विद्यार्थी. मात्र संगणक जोडणीसारख्या तांत्रिक कामांमध्ये त्याला विलक्षण गती आहे. भंगारचा व्यवसाय करणारे त्याचे वडील रवींद्र यांना मिळालेल्या टाकाऊ ई कचऱ्यापासून त्याने चक्क संगणक बनविला आहे. अगदी कोणालाही विकत घेणे आणि वापरणे परवडेल असा संगणक बनविण्याचा त्याचा निर्धार आहे.

आपल्या मुलाला शालेय अभ्यासक्रमात काहीच गती नसल्याबद्दल रवींद्र यांना मोठी खंत होती. मात्र त्याच्या या कामगिरीने त्यांना आता जयंतबद्दल अभिमान वाटत आहे. रवींद्र हे भंगार जमा करण्याचा व्यवसाय करतात. विशेषत: शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयातील ई कचरा ते आणतात. त्यापैकी काही माल पुनर्वापर करण्यासाठी विकला जातो. काहीची दुरुस्ती, डागडुजी करून ते त्याची पुन्हा विक्री करतात. त्यांच्या या व्यवसायातूनच जयंतला संगणक जोडणीची प्राथमिक माहिती मिळाली. आवश्यक साधनसामुग्री मिळाली आणि प्रेरणाही! त्याने शाळेत शिकत असतानाच एक लॅपटॉप दुरुस्त केला होता. आता टाकाऊ वस्तूंपासून त्याने बनविलेला संगणक पाहणारा प्रत्येक जण आश्चर्याने तोंडात बोट घातल्याशिवाय रहात नाही.

जयंताने बनविलेल्या संगणकाचा वापर त्याचे कुटुंबिय तर करतातच. आजूबाजूच्या ज्या मुलांना संगणक विकत घेणे शक्य होत नाही; त्यांनाही जयंत आवर्जून हा संगणक वापरण्यास देतो आणि त्यांच्यात संगणक साक्षरता निर्माण करतो. यापुढील काळात अत्यंत किफायतशीर संगणकाची निर्मिती करून तो प्रत्येक जनसामान्यांच्या आवाक्यात आणण्याचा जयंताचा निर्धार आहे. सध्या तो हॅकींगचे प्रशिक्षण घेत असून वडिलांच्या सांगण्यावरून त्याने १० वीच्या परिक्षेसाठी बाहेरून अर्जही दाखल केला आहे. सध्याच्या काळात कौशल्य विकासाला असलेल्या महत्वाकडे पाहता जयंतने युवकांना एक आदर्श घालून दिला आहे.

Leave a Comment