तापमान नियंत्रण करणारे वैदीक प्लॅस्टर

vedic
हवामान बदलाचे दुष्परिणाम जगभर अनुभवास येऊ लागले असतानाच भारतातील डॉ.शिवदर्शन मलिक यांनी तयार केलेले वैदीक प्लॅस्टर यावरचा चांगला उपाय ठरू शकेल अशी आशा निर्माण झाली आहे. सध्या घरबांधणीत वाळू, सिमेंट, विटा व स्टिलचा वापर केला जातो. मात्र यामुळे ही घरे उन्हाळ्यात अधिक गरम व थंडीत अधिक गार होतात. हवामान बदलामुळे तापमान एकूणच वाढते राहिल्याने घरे अधिक तापतात. यावर उपाय म्हणून वैदिक प्लॅस्टरचा वापर फारच उपयुक्त ठरला आहे.

हे प्लॅस्टर वापरून बांधलेली घरे ध्वनीरोधक, अग्नीरोधक तसेच उष्णतारोधकही आहेत. उन्हाळ्यात ती थंड राहतात तर थंडीत उबदार राहतात. यात गोमय, जिप्सम, चुना, गवारगमचा वापर केला जातो. गोमयाच्या वापरामुळे नैसर्गिक पद्धतीनेच वायू स्वच्छ केले जातात व प्रदूषण टळते. तसेच या प्लॅस्टरसाठी वाळूची गरज नसते. यात वापरलेले सर्व पदार्थ उष्णतारोधन करणारे आहेत. म्हणजेच ते बाहेरची उष्णता आत येऊ देत नाहीत तसेच आतील उष्णता बाहेर जाऊ देत नाहीत. परिणामी ही घरे उन्हाळ्यात थंड व थंडीत उबदार राहतात.

हे प्लॅस्टर सिमेंटच्या तुलनेत थोडे महाग आहे मात्र तरीही त्याची मागणी लक्षणीयरित्या वाढती आहे असे शिवदर्शन यांचे म्हणणे आहे. नोव्हेंबरपासून या प्लॅस्टरचे उत्पादन भारतात सुरू झाले आहे व देशातील बहुतेक सर्व राज्यांतून त्याला मागणी आहे. शिवदर्शन यांच्या मते १ ते दीड लाख रूपये गुंतवून कोणीही या प्लॅस्टरची निर्मिती सुरू करू शकतो. यामुळे रोजगारही उपलब्ध हेाऊ शकतो असाही त्यांचा दावा आहे.

Leave a Comment