९६ हजार कोटीला पडले ‘गॅलेक्सी नोट ७’चे रिकॉल

samsung-galaxy
सिओल – आपल्या ‘गॅलेक्सी नोट ७’च्या ‘रिकॉल’मुळे ‘सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स’ला मोठे नुकसान झाले आहे. या कोरियन कंपनीचे समभाग दोन महिन्यांच्या नीचांकी स्तरावर पोहचले आहेत. यामुळे कंपनीच्या बाजार भांडवलात जवळपास ९६ हजार कोटी रुपयांची घट झाली. ‘सॅमसंग’ने अलिकडेच गॅलेक्सी नोट ७ हँडसेटच्या बॅटरीला आग लागल्याच्या घटना घडल्याने ग्राहकांना फोन बंद करून कंपनीकडे परत देण्याबाबत सूचना केल्या होत्या.

गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ झाल्याने सॅमसंगचे बाजार भांडवल १४.३ अब्ज डॉलर म्हणजे ९६ हजार कोटी रुपयांनी कमी झाले. मंगळवारी शेअरबाजारात जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी असलेल्या ‘सॅमसंग’च्या समभागात ६.९८ टक्के घसरण झाली. तज्ञांच्या मते, सॅमसंगच्या तिस-या तिमाहीत नफ्यात ९० कोटी डॉलरची घसरण शक्य आहे. तिस-या आणि चौथ्या तिमाहीत नोट ७ ची ६० लाख हँडसेटची विक्री शक्य आहे, जी पहिल्या तिमाहीत १.२ ते १.५ कोटी हँडसेट एवढी होती. तज्ञांच्या मते, नवीन नोट ७ मध्ये मागील हँडसेटमधील त्रुटी दूर होणे आवश्यक आहे. जर त्रुटी निर्माण झाल्यातर त्याचा परिणाम गॅलेक्सी एस ८ वर दिसून येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment