२७ हजार किलोमीटरचा इकॉनॉमिक कॉरिडॉर होणार

corri
मालवाहतूकीसाठीचे अडथळे दूर व्हावेत यासाठी २७ हजार किलोमीटरचे ४४ हायवे बांधण्यात येणार असल्याचे रस्ते वाहतूक मंत्रालयातील सूत्रांकडून सांगितले गेले आहे. यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेतच पण त्याचबरोबर आर्थिक उलाढलीलाही वेग येणार आहे. इकॉनॉमिक कॉरिडॉर असे या योजनेचे नांव असून यात ३० मोठी शहरे जोडली जाणार आहेत.

विशेष म्हणजे या कॉरिडॉरमुळे जोडल्या गेलेल्या शहरांत वाहतूक कोंडी होण्याची अजिबात शक्यता नाही कारण शहरांजवळ बांधण्यात येणार्‍या रिंग रोडवर माल लोड अनलोड करण्याची सुविधा दिली जाणार आहे. अटल बिहारींच्या काळात सुवर्ण चतुष्कोन ही १३ हजार किमीची देशाचे चारी कोपरे जोडणारी योजना अमलात आणली गेली होती. त्यापेक्षाही या योजनेचा विस्तार अधिक आहे. या योजनेत हायवे विस्तार उत्पादन केंद्रे व बंदरांपर्यंत केला जाणार आहे. ही येाजना सहा वर्षात पूर्ण केली जाईल व त्यासाठी ६ लाख कोटी खर्च अपेक्षित आहे.

या योजनेशिवाय १५ हजार किलोमीटरचे फिडर रूटस व ४० इंटरकनेक्टिंग कॉरिडॉरही उभारले जाणार आहेत. सुवर्ण चतुष्कोन व ४४ इकॉनॉमिक कॉरिडॉरही जोडले जाणार आहेत. ही योजना भारतमाला योजनेचाच एक भाग आहे असेही समजते. चार ते सहा लेन असलेले हे रस्ते बांधण्यासाठीचा खर्च आंतरराष्ट्रीय कर्ज, डेव्हलपमेंट सेस, खासगी गुंतवणुक यातून केला जाणार आहे.

Leave a Comment