नितीशकुमार यांची परीक्षा

nitish
नरेन्द्र मोदी यांना पर्याय कोण असा सवाल आता फारच तीव्र झाला आहे कारण त्यांना शह देऊ शकतील असे नेते आता एकेक करून बाद व्हायला लागले आहेत. या बाबत मोदी विरोधक फारच भ्रमित झाले आहेत. राहुल गांधी हे मोदींना चोख उत्तर आहे असा दावा अनेकांनी केला होता पण राहुल गांधी यांची क्षमता वरचेवर उघडी होत असून ते मोदींचा पर्याय होऊ शकत नाहीत हे दिसून येत आहे. अरविंद केजरीवाल हा पर्याय होणे तर दूरच पण ते राज कारणातूनच बाद होतील की काय असे वाटायला लागले आहे. एकेक पर्याय असा बाद व्हायला लागल्याने मोदींना पर्याय शोधणारांना त्याची एवढी घाई झाली की, त्यांनी जेएनयू मधील उडपटांग नेता सुशीलकुमार यालाच मोदींचा पर्याय करण्यास सुरूवात केली पण त्याला तर हे सोंग एक महिनाही रंगवता आले नाही. आता राष्ट्रीय राजकारणात मोदींचा एकच पण क्षीण पर्याय राहिला आहे आणि तो आहे जनता दलाचे नेते, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार. ते मोदींना पर्याय म्हणून समोर येत असतानाच त्यांच्या या स्थानाला जबरदस्त आव्हान निर्माण होणार्‍या काही घटना बिहारातच घडत आहेत.

नितीशकुमार यांनी २००५ साली बिहारात मुख्यमंत्रीपद हाती घेतल्यानंतर लालूंनी पोसलेले जंगल आणि गुंडाराज संपुष्टात आणण्याच्या हेतूने कारागृहात बंद केलेले लालूं च्याच राजदचे नेते शहाबुद्दीन हे आता ११ वर्षांच्या न्यायालयीन कोठडीतून बाहेर आले आहेत. शहाबुद्दीन यांना तुरुंगात टाकले गेले तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत मोठा फरक पडला असणारच. कारण कोणत्याही राज्याचे राजकारण असे एक दशकभर एकाच वळणाने वहात नसते. बिहारही त्याला अपवाद असण्याचे काही कारण नाही. तिथेही बदल झाला आहेच पण या बदलाची खासीयत अशी की, तिथले राजकारण फिरून पूर्वीच्याच स्थितीत आले आहे. त्याने मोठेच नाट्यमय वळण घेतले आहे. नितीशकुमार यांनी शहाबुद्दीनला आत टाकले तेव्हा त्यांचे मुख्यमंत्रिपद भाजपाच्या आधारावर होते. त्यांनी लालूंच्या गुंडाराजला संपवण्यासाठी या कुविख्यात गुंडाला अटक टाकली पण आता त्यांचे मुख्यमंत्रिपद शहाबुद्दीनच्याच पक्षाच्या टेकूवर अवलंबून आहे. म्हणजे ११ वर्षांपूर्वी ज्याला संपवण्यासाठी काही निर्णय घेतला त्यालाच आता सलाम करावा लागत आहे. शहाबुद्दीन यांनाही त्याची चांगलीच जाणीव आहे. सुशानन निर्माण करण्यासाठी ज्या मुख्यमंत्र्याने आपल्याला गजाआड केले त्याला आता आपल्याच मर्जीवर मुख्यमंत्रीपद मिळाले आहे ही जाणीव सिवानच्या या नेत्याला झाली आहे.

त्यांनी तुरुंगातून बाहेर पडताच नितीशकुमार यांनी या स्थितीची जाणीव करून दिली आहे. त्याची ही जाणीव करून देण्याची पद्धतही मोठी स्फोटक ठरली आहे. त्याने सुटका होताच आपल्या १०० मोटारींची मोठी मिरवणूक काढली. तिच्यात बेफाम धावणार्‍या शेकडो फटफट्या मोठयाने हॉर्न वाजवत सामील झाल्या होत्या. अकरा वर्षांनंतर तुरुंगातून झालेली ही सुटका कोणाची आहे हे लोकांना लक्षात यावे यासाठी हा हैदोसधुल्ला करण्यात आला. हे सारे खरे तर भाजपाला दाखवण्यासाठी असायला हवे पण ते तसे नव्हते तर नितीशकुमार यांच्या नाकावर टिच्चून होते. गंमत म्हणजे या प्रकाराचे लालूंनीही समर्थन केले. नितीशकुमार यांचे पोलीस हा सारा प्रकार मुकाटपणाने पहात होते कारण शहाबुद्दीन हे आता त्यांचे साथी आहेत. अकरा वर्षांपूर्वी नीतीमत्तेचा आव आणणारे नितीशकुमार या प्रकाराने नैतिकदृष्ट्या पराभूत झाल्याची भावना प्रकट करीत होते. शहाबुद्दीन यांनी बाहेर पडताच नितीशकुमार हे परिस्थितीमुळे झालेले मुख्यमंत्री आहेत असे विधान केले. गंमत म्हणजे लालूंनी शहाबुद्दीनच्या या विधानाचे समर्थन तर केलेच पण नकळतपणे त्याला दुजोराही दिला.

नितीशकुमार यांनी या विधानावर प्रतिक्रिया दिली पण ती केविलवाणी होती. त्यांनी आपल्याला जनतेचा कौल मिळाला आहे असे म्हटले खरे पण वस्तुस्थिती तशी नाही. त्यांना लालूंनी पाठींबा दिलाय म्हणून ते मुख्यमंत्री होऊ शकले आहेत हेच खरे आहे. नितीशकुमार हे एकदा भाजपाच्या आणि एकदा राजदच्या जीवावरच हे पद प्राप्त करू शकले आहेत. त्यांना जनाधार नाही. ते स्वत:च्या ताकदीवर २० सुद्धा आमदार निवडून आणू शकत नाहीत हे शहाबुद्दीनचे म्हणणे खरेच आहे. आता ते शहाबुद्दीनच्या तोेंडाला लागतील तर फारच उघडे पडतील कारण त्यांनी शहाबुद्दीनला काहीही म्हटले तरी त्याची काही प्रतिष्ठा जाणार नाही कारण त्याला मुळात प्रतिष्ठाच नाही. पण या दोघांच्या शाब्दिक चकमकीत शहाबुद्दीन त्यांना जी काही उत्तरे देईल त्यांच्यामुळे नितीशकुमार यांचे वस्त्रहरण मात्र होणार आहे. लालूंनी शहाबुद्दीनच्या बोलण्यावर काही नियंत्रण ठेवावे असेही नितीशकुमार यांना म्हणता येत नाही. कारण लालू शहाबुद्दीनच्याच मागे उभे आहेत. त्याच्यावर ४० आरोप आहेत आणि त्याने आणखी काही वर्षे आत रहायला हवे होते पण सरकारी वकिलांनी आपली बाजू नीट मांडली नाह म्हणून तो सुटला असाही आरोप सरकारवर म्हणजेच नितीश कुमार यांच्यावर होत आहे. एकंदरीत शहाबुद्दीन हे नितीश कुमार यांच्या वाटचालीतले मोठेच संकट ठरणार असे दिसायला लागले आहे.

Leave a Comment