बँकासाठी ‘जनधन’ खाती बनली डोकेदुखी

jan-dhan
अधिकारीच खात्यात भरत आहेत रुपया, दोन रुपये
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘जनधन’ योजनेंतर्गत देशभरातील बँकांमध्ये कोट्यावधी बचत खाती उघडली गेली असली तरी त्यामार्फत कोणतेही व्यवहार होत नाहीत. मात्र शून्य जमा असलेल्या खात्यांची संख्या घटविण्याच्या दबावाखाली बँकांचे अधिकारी या खात्यांमध्ये एक, दोन रुपये भरून ती सुरू ठेवत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही अनुत्पादक खाती बँकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

देशातील ६० टक्क्यांहून अधिक जनता बँकिंग सुविधांच्या क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे रोखीचे, छुपे व्यवहार वाढून त्यातून भ्रष्टाचार, काळा पैसा याला प्रोत्साहन मिळत आहे. त्याचप्रमाणे शासकीय योजनांकडून मिळणाऱ्या अनुदानासारखी रक्कम लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. बँकांकडून अर्थसहाय्य नसल्याने शेतकऱ्यांसह अन्य वंचित घटकांना खाजगी सावकारांकडून होणाऱ्या पिळवणुकीला तोंड देत प्रसंगी मृत्यूला कवटाळावे लागत आहे. या दुष्टचक्रापासून जनतेला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधानांनी ‘जनधन’ अंतर्गत शून्य शिलकीची बचत खाती उघडण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले. त्याला प्रतिसाद म्हणून देशभरात २५ कोटीहून अधिक बचत खाती उघडण्यात आली. मात्र या बचत खात्यात कोणतेही प्रत्यक्ष व्यवहार होत नसल्याने प्रचंड आव्हाने बँका आणि सरकारसमोर उभी रहात आहेत.

या खात्यांच्या व्यवहाराबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेल्या माहितीच्या संकलनासाठी देशातील ६ राज्यांमधील बँकांमधील अधिकारी वा कर्मचाऱ्यांकडे माहिती घेतली असता त्यांनी ही खाती शून्य शिलकीची राहू नयेत आणि अशा खात्यांची संख्या कागदावर कमी दिसावी; यासाठी काही अधिकाऱ्यांनी या खात्यावर किरकोळ रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारकडून थेट दबाव नसला तरी अन्य नियंत्रक यंत्रणांच्या दबावाखाली त्यांनी हे पूल उचलल्याचे दिसून आले आहे.

Leave a Comment