आम आदमी पार्टीला केवळ ग्रहणच लागले आहे असे नाही तर तिला पतनाचे वेध लागले आहेत. राज्यपालांशी असलेल्या संघर्षात या पक्षाने अनेकदा पराभव पत्करला. नंतर पक्षाचे २१ आमदार अपात्र ठरण्याचे संकट उभे राहिले. पण आता पक्षाला वासनाकांडाचे वेध लागले आहेत. खुद्द पक्षाचे संस्थापक आणि सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनाही अशा एका आरोपाने घेरले आहे. त्यांची अनेक पातळ्यांवर फजिती व्हायला लागली आहे. केजरीवाल यांनी नुकताच दिल्लीपासून लुधियाना पर्यंत रेल्वेने प्रवास केला. ते लूधियानात उतरले आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपण या रेल्वे प्रवासात काही प्रवशांशी बोललो तेव्हा त्यातल्या बहुतांश प्रवाशांनी रेल्वेच्या दरात करण्यात आलेल्या वाढीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. तसे छापूनही आले पण दुसर्याच दिवशी एका प्रवाशाने आपल्या ब्लॉगवर केजरीवाल किती खोटारडे आहेत हे दाखवून दिले. आपण ज्या गाडीतून प्रवास करीत होतो त्याच गाडीतून केजरीवालही प्रवास करीत होते आणि आपण त्यांच्यासोबत दिल्ली ते लूधियाना असा पूर्ण प्रवास केला असे या प्रवाशाने सांगितले. या प्रवासात केजरीवाल कोणाशीही बोलले नाहीत आणि त्यांना ओळखूनही एखादाही प्रवासी त्यांच्याशी एक शब्दही बोलला नाही.
आम आदमीचे पतन
तेव्हा त्यांच्यापाशी कोणीही रेल्वेच्या दराबाबत तक्रार करण्याचा काही प्रश्नच नाही पण केजरीवाल मात्र आपल्याशी लोक बोलल्याची थाप ठोकून देतात आणि लोकांनी आपल्याजवळ सरकारच्या विरोधात तक्रारी केल्या अशीही पुस्ती जोडतात. यावरून केजरीवाल हा माणूस किती बनेल, नकली आणि खोटारडा आहे हे लक्षात येते. असा माणूस काही काळ लोकांना फसवू शकतो पण फार काळ त्याला ही बनवाबनवी करता येणार नाही. किंबहुना केजरीवाल यांचे आणि त्यांच्या आम आदमी पार्टीचे पितळ उघड पडत चालले आहे आणि हा एक तकलादू नेता आहे याची जाणीव लोेकांना होत आहे. ही बाब किंवा त्यांच्या बाबतीतच होत आहे असे नाही तर त्यांच्या पक्षाचीही अवस्था अशीच आहे. स्थापन झाल्यापासूनच्या दोनच वर्षात आम आदमी पार्टी हे एक दिड दमडीचे नाटक असल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे. भारतातले कम्युनिष्ट पक्ष, समाजवादी पार्टी, इत्यादी पक्ष असेच अर्धवट शहाण्यांकडून चालवले जात असल्याने संपत चालले आहेत. देशात कॉंग्रेसचे विसर्जन कधी होतेय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राहुल गांधी त्या दिशेने वेगाने पावले टाकत आहेत. अन्य पक्षांपैकी बहुतांश पक्षांनी आपली जात आणि आपला प्रांत यापुरतेच आपले अस्तित्व असल्याचे दाखवून दिले आहे.
राष्ट्रीय राजकारणात भाजपाला आणि नरेन्द्र मोदी यांच्या सरकारला कोण टक्कर देणार हा प्रश्न जाणकारांना पडला आहे. आपल्या पक्षाचे असे श्राद्ध घालणारे काही डावे आणि उपद्व्यापी नेते भाजपाला शह देणारा नेता म्हणून केजरीवाल यांच्याकडे पहात होते. पण हा कथित समर्थ पर्यायी नेता तर अगदीच कचकड्याचा आहे असे सप्रमाण दिसायला लागले आहे. एखादा पक्ष स्थापनेनंतर केवळ दोनच वर्षात प्रचंड मतांनी सत्तेवर यावा आणि तेवढ्याच वेगाने त्याने अस्ताकडे वाटचाल करावी असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता. तो आम आदमी पार्टीच्या बाबतीत घडत आहे. तसे तर देशात असे अनेक पक्ष स्थापन होऊन थोडक्याच काळात अस्तंगत झाले आहेत. अशा पक्षांना या देशात काही तोटा नाही पण त्यांचा आणि आपचा प्रकार वेगळा आहे. इतर पक्षांचा आवाका त्यांच्या स्थापनेच्या वेळीच ध्यानात आला होता. त्यामुळे या पक्षांचे जन्म झाले तेव्हाच ती बाळे फार दिवस जगणार नाहीत आणि जगली तरी फार बाळसे धरणार नाहीत याचा अंदाज आलेला होता पण आम आदमी पार्टीने स्वत:विषयी अनेक अपेक्षा निर्माण करून ठेवल्या होत्या.
एवढेेच नाही तर अरविंद केजरीवाल हे नरेन्द्र मोदी यांना पर्याय म्हणून पुढे येतील आणि देशातली विरोधी पक्षाची पोकळी भरून काढतील असे बोलले जात होते. आपण मोेदींना परास्त केले पाहिजे असे काही पक्षांचे नेते म्हणत आले होते. मात्र आपल्यात की ताकद नाही याची जाणीव होऊन ते निराश झाले होते. आपली ही असमर्थता त्यांना डाचत होती आणि तेच लोक आपण नाही तरी काही हरकत नाही पण केजरीवाल हेच मोदींना प्रभावी शह देतील अशी आशा ते मनात धरून होते पण प्रत्यक्षात ते पहायला लागले आहेत की केजरीवाल यांनी त्यांचा भ्रमनिरास केला आहे. ज्या गतीने ते राजकारणात पुढे आले त्याच गतीने त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा र्हास होत आहे. गेले काही दिवस त्यांच्यावर अनेक आपत्ती येत आहेत. त्या आपत्ती काही दैवी नाहीत. त्या त्यांनी आपल्या हातांनी ओढवून घेतल्या आहेत. भस्मासुराने असेच केले होते. त्याने भगवान शंकराकडून वरदान मागून घेतले आणि ते वरदान नंतर त्यालाच अंगलट आले तसेच केजरीवाल यांचे झाले आहे. ते अत्यंत पोरकट आणि बालीश आहेत. लबाड आहेत. राजकारणात डावपेच तर असतातच पण केजरीवाल यांच्या राजकारणात जे काही टाकले जातात ते डावपेच नसून केवळ माकड चेष्टा आहेत असे जगाला दिसत आहे. अण्णा हजारे यांनी त्यांना राजकीय पक्ष स्थापन न करण्याचा सल्ला दिला होता पण तो केजरीवाल यांनी मानला नाही. त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत.