यंदाच्या गणेशोत्सवातील कांही अनोख्या पर्यावरणपूरक प्रतिमा

eco
गणेशोत्सवात मूर्तींमुळे होत असलेले प्रदूषण व पर्यायाने पर्यावरणाला पोहोचत असलेला धोका याबाबत नागरिकांतील जागृती वाढते आहे याचे चांगले पुरावे सध्याच्या गणेशोत्सवात देशभरातून मिळत आहेत. यावेळी अनेक प्रकारच्या गणेश प्रतिमा साकारल्या गेल्या असून त्यांच्यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नाही. शिवाय लोकांना गणेश प्रतिमा साकारताना वेगवेगळे प्रयोग करता आले याचेही समाधान आहेच. त्यातील कांही गणेश प्रतिमांची माहिती खास माझा पेपरच्या वाचकांसाठी.

choco
१)चॉकलेट गणेश- चॉकेलटपासून गणेश प्रतिमा बनविण्याची कल्पना नवी नाही मात्र यंदा लुधियाणातील बेकरी मालक हरविदरसिंग यांनी ४० किलो बल्जियन चॉकलेटपासून गणेश मूर्ती साकारली आहे व त्याचे विसर्जन दुधात केले जाणार आहे. दुधात हे चॉकलेट मिसळले जाईल व नंतर हे दूध प्रसाद म्हणून गरीब घरातील मुलांना पिण्यासाठी दिले जाणार आहे.

masala
२)मसाला गणेश- मुंबईतील मालाडच्या साईदर्शन मित्र मंडळाने १९० किलो मसाले पदार्थांचा वापर करून नऊ फुटी गणेश प्रतिमा साकारली आहे. यात ९ किलो लवंगा, २० किलो दालचिनी, ६ किलो मिरची, १ किलो मोहरी यांचा वापर केला गेला आहे. शिवाय वेलदोडे वगैरे अन्य मसाले पदार्थही आहेतच.

turti
३)तुरटी गणेश- पुण्यातील विवेक कांबळे यांनी पाणी शुद्ध करणार्‍या तुरटीपासून गणेश प्रतिमा तयार केली आहे. ती विविध खाद्यरंगांनी सजविली गेली आहे. या गणेशाचे पाण्यात विसर्जन केल्यानंतर तुरटी पाण्यात पूर्ण विरघळेल व त्यापासून पाणी स्वच्छच केले जाईल.

sugarcane
४)ऊस गणेश – या ठिकाणी अतिभव्य अशी गणेशमूर्ती साकारली गेली आहे व त्यासाठी उसाचा वापर केला गेला आहे. ऊस खूप दिवसांपर्यंत चांगला टिकतो व त्यामुळे १० व्या दिवशी विसर्जनावेळी ही मूर्ती मोकळी करून हा ऊस खाण्यासाठी पुन्हा वापरता येणार आहे.

gobar
५)गोबर गणेश- अनेक ठिकाणी यंदा गोमयापासून गणेश प्रतिमा केल्या गेल्या आहेत. त्या पाण्यात सहज विरघळतात व पाण्याचे प्रदूषण होत नाही. गुजराथेतील साबरकाठा येथील महिलांनी माती व नारळाचा भुसा यापासून गणेश प्रतिमा साकारली आहे. या मूर्तीमुळेही पर्यावरणाचे अथवा पाण्याचे कोणतेही नुकसान होणार नाही.

६)फिश फ्रेंडली गणेश- गणेश प्रतिमा शेवटी पाण्यातच विसर्जित केली जाणार मग त्यापासून पाण्यातील माशांना खाद्य देता आले तर? याच विचाराने स्प्राउट एनव्हीरॉनमेंटल ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने मासे खाऊ शकतील अशा पदार्थांचा वापर करून गणेशमूर्ती तयार केली आहे. त्यात मका, गहू, भाज्यांच्या पावडरी यांचा वापर केला गेला आहे. एकेठिकाणी कँडी गणेश बनविला गेला आहे. त्यात विविध प्रकारची चॉकलेट वापरली गेली आहेत.

Leave a Comment