जिओ विरोधात एअरटेलची ‘ट्राय’कडे धाव

jio
नवी दिल्ली: धूमधडाक्यात रिलायन्स जिओने एण्ट्री केल्यामुळे सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणल्यामुळे एअरटेलने थेट टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायकडे मदतीची याचना केली असून जिओच्या मोफत कॉल्सच्या त्सुनामीमुळे विविध नेटवर्कवर कसलाही वाईट परिणाम होऊ नये, यासाठी उपाययोजना करावी, असे आवाहन एअरटेलने ट्रायकडे केले आहे.

शुक्रवारी ट्रायसोबत एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि रिलाइन्स जिओच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत रिलायन्स जिओमुळे इतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये इंटरकनेक्ट पॉईंटसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नावर चर्चा झाली. इंटरकनेक्ट पॉईंटच्या माध्यमातूनच मोबाईलवरून करण्यात येणारा प्रत्येक कॉल पूर्ण होऊ शकतो. जर एखादा टेलिकॉम ऑपरेटर दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटरला आवश्यक संख्येत इंटरकनेक्ट पॉईंट उपलब्ध करून देत नसेल, तर कॉल ड्रॉपच्या संख्येत वाढ होते.

आरोप-प्रत्यारोपाच्या अनेक फैरी या बैठकीवेळी झाडल्या गेल्या. रिलायन्स जिओने इतर टेलिकॉम कंपन्यांकडून इंटरकनेक्ट पॉईंट उपलब्ध करून न दिल्याने, जिओ ग्राहकांना मोठ्या प्रमाणात कॉल ड्रॉपचा सामना करावा लागत असल्याचा आरोप केला. पण यावर जितक्या संख्येत इंटरकनेक्ट पॉईंट उपलब्ध आहेत. ते सर्व ग्राहकांना उपलब्ध करून दिल्याचे इतर कंपन्यांनी स्पष्ट केले. तसेच करारानुसार आम्ही ३१ डिसेंबरपर्यंत रिलायन्सला इंटरकनेक्ट पॉईंट उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन एअरटेलने दिले.

Leave a Comment