महिंद्रा-ओला देणार ४० हजार ड्राईव्हर्सना रोजगार

mahindra
मुंबई: देशातील सर्वात मोठ्या शेअर्ड वाहतूक सुविधेसोबत जगप्रसिद्ध महिंद्रा अँड महिंद्रा आणि ओला यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) झाला असून या करारानुसार या दोन्ही कंपन्यांनी २०१८ पर्यंत या ४०० दशलक्ष डॉलरच्या (२,६०० कोटी रुपये) वाहन विक्री आणि वित्तपुरवठ्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्यामुळे सुमारे ४०,००० वाहन चालकांना रोजगार मिळणार असून, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार आहे.

याबाबत महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा व ओलाचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भाविष अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओलाच्या चालक भागीदारांना आता एकात्मिक व आकर्षक ‘महिंद्रा-ओला’ पॅकेज मिळेल आणि त्यामध्ये विशेष दरांमध्ये महिंद्रा कार्स, झीरो डाउन पेमेंटसह आकर्षक वित्तपुरवठा, सर्वोत्तम व्याजदर, अनुदानित विमा प्रीमिअम, सर्वंकष मेन्टेनन्स पॅकेज, तसेच ओला सुविधेचे विशेष लाभ यांचा समावेश असणार आहे.

आनंद महिंद्रा या वेळी बोलतना म्हणाले, हा उपक्रम ही काळाची गरज असून, त्यामध्ये भारतीय ग्राहकांच्या, प्रामुख्याने शेअर्ड वाहतुकीला प्राधान्य देणाऱ्या तरुणांच्या सध्याच्या आणि भविष्यातील गरजा पूर्ण केल्या जाणार आहेत. यामुळे किमान ४०,००० चालक मालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहाचे साधन मिळणार आहे. तर, अब्जावधी भारतीयांसाठी वाहतुकीची सुविधा विकसित करण्याचे आमचे मिशन असून त्याला या भागिदारीमुळे चालना मिळेल, असे भाविष अग्रवाल यांनी सांगितले.

Leave a Comment