चितकुल- हिमाचल तिबेट सीमेवरचे अखेरचे गांव

chitkul
हिमाचलची राजधानी सिमला पासून २५० किमी असलेले चितकुल अथवा छिटकुल हे निसर्गाने नटलेले नितांतसुंदर गांव समुद्रसपाटीपासून ३४५० मीटर उंचीवर वसलेले असून हे हिमाचल तिबेट सीमेवरचे शेवटचे गांव मानले जाते. अजोड निसर्गसौंदर्याने नटलेले हे गांव फारसे गर्दीचे नाही व त्यामुळे येथील निसर्ग अगदी ताजातवाना आणि अनटच्ड राहिला आहे. किन्नोर जिल्ह्यातील बास्पा नदीच्या उजव्या तीरावर हे गांव वसले आहे. याला किन्नोरचा मुकुट असेही म्हटले जाते. हिमालयाची बर्फाळ शिखरे, चोहोदिशांनी वाहणारे झरे आणि हिरवळ असे या गावाचे रूपडे आहे.

kamakhya
येथे जाण्यासाठी अवघड घाट, वळणावळणांचा धोकादायक रस्ता पार करावा लागतो पण एकदा या गावात पोहोचले की सारा शिणवटा एका क्षणात नाहिसा होतो असा अनुभव पर्यटक तसेच ट्रेकर्सही सांगतात. येथील स्थानिक देवी माथी असून तिची तीन मंदिरे येथे आहेत. सिमल्यावरून जाताना पर्वतश्रेणींकडे मार्गक्रमण करताना शिवालिक पर्वतरांगांचे मनोहारी दर्शन सतत होत असते. वाटेत लागणार्‍या नारकुंडा पासून ५ किमीवर हाटू मंदिर आहे. ३४०० मीटर उंचीवर वसलेले हे मंदिर देवदारांच्या घनदाट झाडीत आहे. लाकडापासून हे मंदिर बांधले गेले असून स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हे रावणाची पत्नी मंदोदरीचे देऊळ आहे. येथूनच हाटू पीकला जाता येते. या पीकवर पोहोचलो की ढगांचे थरच्या थर अंगावर येतात व आकाशात विहरत असल्याचा अनुभव घेता येतो.

या मार्गावरचे अवघड रस्ते म्हणचे वाहनचालकाला आव्हानच आहे. रक्छाम पासून १० किमीवर चितकुल आहे. येथे ट्रेकर्स पायीही जातात. जवळच असलेल्या कामारू गावांत कामरू हा १५ व्या शतकांत बांधलेला गड आहे. येथे कामाख्या देवीचे मंदिर आहे. गड व देवळातील लाकडावरचे कोरीवकाम अप्रतिम आहे. चितकुलला जायचे असेल तर एप्रिल ते जूनचा मध्य व जून पासून आक्टोबर पर्यंत चांगला काळ आहे. येथे राहण्याच्या,खाण्यापिण्याच्या चांगल्या सुविधा आहेत.

Leave a Comment