रहस्यमयी बाहुल्यांचे बेट

dolls
जगात आज पर्यटन क्षेत्रात चांगलीच प्रगती होत असून आता नैसर्गिक, साहसी, धार्मिक, अध्यात्मिक, वैद्यकीय पर्यटन अशी वेगवेगळी क्षेत्रेही तयार झाली आहेत. त्यातच आता धाडसी किवा हाँटेड प्लेसेस टूरिझम म्हणजे रहस्यमयी ठिकाणांचे पर्यटन अशी नवी शाखाही लोकप्रिय होऊ पाहते आहे. मेक्सिकोतील बाहुल्यांचे बेट हे असेच रहस्यमयी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस आले आहे.

मेक्सिको शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या इस्ला डी लास मुनिकास या बेटात पर्यटक येण्याचे प्रमाण दिवसेनदिवस वाढतच चालले आहे. या रहस्यमयी बेटांला बाहुल्यांचे बेट असे म्हटले जाते. या बेटांवर असलेल्या झाडांवर अनेक मोडक्या तोडक्या बाहुल्या टांगल्या गेल्या आहेत. अनेकदा या बाहुल्या आपोआप हालचाल करतात असेही म्हटले जाते. तसेच या बेटावर अनेक भीतीदायक घटना घडतात असेही स्थानिक सांगतात.

कांही वर्षांपूवी या बेटावर एक लहान मुलगी बुडून मरण पावली. एका व्यक्तीला या मुलीचा मृतदेह मिळाला त्यासोबत एक बाहुलीही होती. त्याने या मुलीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ही बाहुली झाडाला टांगली व नंतरही अनेक बाहुल्या त्याने येथील झाडांवर लटकविल्या. कांही काळानंतर हा माणूस जेथे त्याला पहिली बाहुली मिळाली होती तेथेच मृतावस्थेत सापडला. या बेटावर मृत मुलीचा आत्मा अजूनही वास्तव्य करतो असा लोकांचा समज आहे. हे स्थान पाहायला पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.

Leave a Comment