जपानमध्ये वाढतोय रडणे, रडविण्याचा उद्योग

weep
कुणाला कुठली कल्पना सुचेल व कोण काय उद्येाग सुरू करतील हे ब्रह्मदेवालाही सांगणे अवघड. जपानमध्ये सध्या रडणे व रडविण्याचा उद्योग चांगलाच फोफावला असून अनेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना रडविण्यासाठी या उद्योगाची सेवा घेत असल्याचे समजते. यात सामील झालेल्या कर्मचार्‍यांना अगदी करूण दृष्ये दाखवून प्रथम रडविले जाते व नंतर त्यांचे अश्रू रूमालाने पुसले जातात. यामुळे कर्मचार्‍यांत संघभावना वाढीस लागते व त्यामुळे कंपन्यांची कामे टीमवर्कने अ्धिक चांगल्या प्रकारे केली जातात असा दावा केला जात आहे.

यात कर्मचार्‍यांना एका हॉलमध्ये बसवून करूण फिल्म दाखविल्या जातात. त्यात बापलेक व पाळीव प्राणी यांच्या संदर्भातल्या अनेक हृदयद्रावक फिल्म असतात. फिल्म पाहताना कुणा ना कुणा कर्मचार्‍यांच्या भावनांचा बांध फुटतो व तो मुसमुसू लागला की बाकीचेही आपोआपच डोळे पुसू लागतात. सर्वजण पुरेसे रडले असे वाटले की एक हँडसम विपिंग बॉय म्हणजे अश्रू पुसणारा मुलगा त्यांचे रूमालाने अश्रू पुसतो. परिणामी लोकांच्या मनात संघभावना वाढीस लागते.

जपानमध्ये सर्वसाधारण पणे नागरिक आपले दुःख जाहीर रित्या व्यक्त करत नाहीत त्यामुळे त्यांच्यातील कोमल भावना दबल्या जातात. या प्रकारे त्यांना रडविले गेल्यानंतर ते मोकळे होतात व भावनिक दृष्ट्याही आपल्या सहकार्‍यांशी जोडले जातात. याचा फायदा एकमेकांना मदत करत वेगाने काम पूर्ण करण्यासाठी होतो.

weep1
हिरोकी तराई नावाच्या युवकाला ही कल्पना प्रथम सुचली. तो एकलकोंडा होता व त्याला मित्र फारसे नव्हते. तेव्हा आपल्या मनातील भावना दुसर्‍यांपर्यंत कशा पोहोचवायच्या याचा विचार तो करू लागला. त्यातूनच त्याला दुसर्‍यांच्या मनातील भावना जोखायचा नाद लागला. त्यातून त्याने हे प्रयोग सुरू केले. त्यात पहिला प्रोजेक्ट घटस्फोट घेणार्‍यांसाठी केला गेला. यात घटस्फोट घेऊ इच्छीणार्‍यांची अंगठी हातोड्याने फोडण्याचा कार्यक्रम होत असे. यामुळे संबंधितांच्या भावना उचंबळून येत व परस्परांवरच्या रागाचा निचरा होत असे. आता रडण्यामुळे लोकांच्या मनावरचे ओझे कमी करण्यासाठी तो विविध प्रयोग करत आहे. रडणे हा हृदय मोकळे करण्याचा सर्वात चांगला मार्ग असल्याचे त्याचे म्हणणे आहे.२०१३ पासून त्याने हा रडण्या रडविण्याचा उद्योग सुरू केला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Comment