किब्बर – जगातले सर्वाधिक उंचीवरचे गांव

kibbat
समुद्रसपाटीपासून तब्बल ४८५० मीटर म्हणजे साधारण १४ हजार फुटांवर वसलेले हिमाचल प्रदेशातील किब्बर हे जगातील सर्वाधिक उंचीवर वसलेले गांव आहे. हिमाचलच्या स्पिती खोर्‍यात वसलेले किब्बर राजधानी सिमला पासून ४३० किमी दूर आहे व येथे जाण्यासाठी खडतर मार्गाचा प्रवास करावा लागतो. स्पितीपासून १२ तासांचा हा खडतर प्रवास सार्थकी लागेल असे निसर्गसौंदर्य या गावाला निसर्गाने बहाल केले आहे. याच गावात जगातील सर्वात उंचावर असलेला बौद्ध मठही आहे.

kibbar
स्पिती नदीच्या उजव्या तीरावर लेसर हे पहिले गांव लागते. स्पिती खोर्‍यातले हे पहिले गांव. तेथन किब्बर २० किमीवर आहे. चहूकडे बर्फाची चादर व मधून जाणारा रस्ता पाहताक्षणीच मोहात पाडतो. येथे सुमो सारख्या गाड्यांतून जाता येते. एकदा का या गावात पाऊल टाकले की आयुष्यभर पुरेल इतका ताजेपणा आणि डोळ्यांचे पारणे फिटेल असे निसर्गसौंदर्य लाभतेच लाभते.त्यामुळे या गावाचा विसर पडणे अवघडच. २०११ च्या जनगणनेनुसार येथे ७७ कुटुंबे आहेत व नागरिकांची संख्या आहे ३६६. येथे पाऊस फारसा पडत नाही मात्र हिमवर्षाव खूप होतो. त्यामुळे येथे बर्फांचे थरच्या थर हे नेहमीचे दृष्य आहे.येथील नागरिक शेती करतात व अन्य शेतीपूरक व्यवसाय करतात. येथून ट्रेकचेही अनेक मार्ग जातात व मोठ्या प्रमाणावर ट्रेकर्स तसेच पर्यटक येथे आवर्जून भेट देतात.

Leave a Comment