सोनीच्या मालकीचे होणार टेन स्पोर्ट्स

ten-sports
नवी दिल्ली – झी एन्टरटेनमेन्टने सोनी पिक्चर्सला टेन स्पोर्ट्स नेटवर्कची २६०० कोटी रुपयांना विक्री केली आहे. झी एन्टरटेनमेन्ट रोख रकमेतून मिळणा-या या रकमेचा वापर आपले प्रादेशिक करमणूक क्षेत्राच्या वाढीसाठी करण्यात येणार आहे. हा व्यवहार पुढील ४-५ महिन्यात पूर्ण होईल. दोन्ही कंपन्यांदरम्यान गेल्या काही महिन्यापासून व्यवहारासाठी चर्चा सुरू होती. गेल्या काही महिन्यांपासून टेन स्पोर्ट्स नुकसानीमध्ये होते. सध्या टेन स्पोर्ट्सच्या जाळय़ात ७ चॅनेल येतात.

टेन१, टेन१ एचडी, टेन२, टेन३, टेन गोल्फ एचडी, टेन क्रिकेट आणि टेन स्पोर्ट्स इत्यादी चॅनेल टेन स्पोर्ट्सच्या नेटवर्कमध्ये आहेत. हे चॅनेल्स भारताव्यतिरिक्त मालदिव, सिंगापूर, हाँगकाँग, मध्य आशिया आणि कॅरेबियनमध्ये प्रसारित होतात. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या देशातील क्रिकेट मंडळांच्या सामन्याचे प्रसारण करण्याचा अधिकार आहे. याव्यतिरिक्त खेळाच्या मोठय़ा सामन्यांच्या प्रसारणाचा अधिकार आहे.

झी समूहाने २००७मध्ये दुबईतील ताज टीव्हीकडून टेन स्पोर्ट्समधील ५० टक्के हिस्सेदारी ७८.३८ कोटी रुपयांना खरेदी केली होती. यानंतर उर्वरित ४५ टक्के हिस्सेदारी २०१०मध्ये खरेदी केली. २००६मध्ये दाखल झालेला टेन स्पोर्ट्स कधीही नफ्यात आला नव्हता. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला या व्यवहाराची माहिती देण्यात आली असून लवकरच आपल्याकडील व्यवहार सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे देण्यात येईल. दोन्ही कंपन्यांदरम्यान झालेल्या व्यवहाराला झी एन्टरटेनमेन्ट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी मंजुरी दिल्याचे कंपनीने सांगितले.

Leave a Comment