गणपतीपाठोपाठ नवरात्रीची धूम सुरू होईल. या काळात देशभरातील महत्त्वाच्या शक्तीपीठांमध्ये भाविकांची रीघ लागेल. पाकिस्तानच्या कब्जात असलेल्या बलुचिस्तानातही या काळात मोठ्या संख्येने भाविक हिंगलाज माता मंदिरात गर्दी करतील. हिंगलाज माता मंदिर हे देवी सतीचे ५१ शक्ती पीठ मानले जाते. यज्ञात जळालेल्या सतीचे शरीर शंकर नेत असताना तिच्या शरीराचे अवयव ५१ विविध ठिकाणी पडले व ती स्थाने शक्कीपीठे म्हणून प्रसिद्ध झाली. हिंगलाज मंदिराच्या जागी सतीचे शीर पडले होते असे मानले जाते. हिंगोल नदीच्या काठी गुहेत हे स्थळ आहे.
बलुचिस्तानातील हिंगलाज माता मंदिर
बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा पासून जवळच असलेले हे स्थान खूपच प्रसिद्ध आहे. सुमारे ९२०० वर्षांपूर्वी येथे ययातीच्या पाच पुत्रांपैकी एक पुरू हा त्याकाळच्या सर्वात मोठ्या राज्याचा राजा होता. पुरूपासूनच कुरू म्हणजे कौरव वंश आल्याचे मानले जाते. बलुचिस्तानची हिंदू व बौद्ध धर्माशी खूपच जवळीक आहे. भगवान श्रीराम, परशुरामाचे वडील जमदग्नी ऋषी यांनीही या स्थळी भेट दिली होती असे मानले जाते. कांही काळ बलुचिस्तानात बौद्ध धर्मही पाळला जात होता कारण या ठिकाणी शेकड्याने बुद्ध मूर्तीही सापडल्या आहेत.
बलूचीस्तानातील मेहरगढ हे ठिकाण सिंधू संस्कृतीतील हडप्पा व मोहनजदारो पेक्षाही प्राचीन संस्कृतीचे ठिकाण मानले जाते. येथून जवळच असलेल्या बालाकोट येथे हडप्पा पूर्व व हडप्पा कालीन अनेक अवशेष मिळाले आहेत. मेहरगड हे सध्याच्या बोलन नदीकाठी बसलेले आहे.