जीडीपी घसरला; औद्योगिक उत्पादनात मात्र वाढ

gdp
नवी दिल्ली: कृषी, खनिकर्म आणि बांधकाम क्षेत्रात उत्पादन घटल्याने या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) काही प्रमाणात घसरला असून सरकारसाठी ती चिंतेची बाब ठरली आहे. औद्योहिक उत्पादनात मात्र उल्लेखनीय वाढ झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मार्चच्या तिमाहीत ७. ९ टक्के असलेला जीडीपीच्या आकडा या तिमाहीत ७. १ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. या तिमाहीत ७. ६ टक्के जीडीपी असेल; असा तज्ज्ञांचा कयास होता. औद्योगिक उत्पादनात मात्र मागील तिमाहीच्या तुलनेत ७. टक्क्यांवरून ९. १ टक्के एवढी वाढ झाली आहे.

निर्यातीचे घटलेले प्रमाण, देशांतर्गत मागणीतही झालेली घट; या पार्श्वभूमीवर जीडीपीचे प्रमाण घटणे हे अपेक्षितच मानले जात होते. देशातून होणाऱ्या निर्यातीत सलग १८ महिन्यांपासून घटच होत आली आहे.

जीडीपीच्या आकडेवारीचे केंद्र सरकारकडून काटेकोरपणे विश्लेषण केले जात आहे. भारत त्याच्या क्षमतेपेक्षा धीम्या गतीने प्रगती करीत असल्याचे सरकारने मान्य केले आहे. देशभरातील लाखो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भारताने नियमित ८ टक्के दराने सातत्यपूर्ण प्रगती साधणे आवश्यक आहे.

मात्र, या वर्षी मोसमी पावसाची दमदार हजेरी, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे लोकांच्या हाती खुळखुळणारा पैसे आणि थेट विदेशी गुंतवणुकीच्या क्षेत्रातील आर्थिक सुधारणांना देण्यात आलेला वेग; यामुळे आगामी काळात जीडीपीमध्ये उल्लेखनीय वाढ होईल; अशी आशा विश्लेषकांना आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत भारताची आर्थिक वाढ ७. टक्के दराने होणार असल्याची शक्यता ‘गोल्डमॅन सच’ या जागतिक गुंतवणूकदार बँकेने मागील आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात वर्तविली आहे. मात्र काही अर्थतज्ज्ञ या वेगाबाबत साशंक आहेत. मागील आर्थिक वर्षात हा दर ७. ६ टक्के होता.

या तिमाहीत जीडीपीचे प्रमाण घातले असले तरीही भारत हि जगातील वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था असून जागतिक अर्थव्यवस्थेत तो आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्याचे मानले जात आहे.

Leave a Comment