अमेरिकेतील एमआयटीमध्ये शाळेत न गेलेल्या विद्यार्थिनीचा प्रवेश

malvika-joshi
मुंबई : अमेरिकेच्या प्रसिद्ध मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एमआयटीत मुंबईच्या १७ वर्षांच्या एका मुलीने थेट प्रवेश मिळवला आहे. ही किमया साधणाऱ्या मालविका जोशीचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षणही पूर्ण झालेले नाही. तिला हे यश कम्प्युटर प्रोग्रॅमिंगमधील कौशल्यामुळे मिळाले आहे.

मालविकाच्या आईने तिला पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा मनाला समाधान देणारे शिक्षण घेण्याचा कानमंत्र दिल्यामुळे मालविकाचे पारशी युथ असेंब्ली या शाळेतून सहावीनंतर नाव काढून घेण्यात आले. अभ्यासात हुशार असलेल्या मालविकाने शाळा सोडल्यानंतर विविध विषयांचा अभ्यास केला. यानंतर कम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये तिला आवड निर्माण झाली. मूळची मुंबईच्या असलेल्या मालविकाने संगणक कोडिंगचा अभ्यास करत प्रतिष्ठित ऑलिम्पियाड परीक्षेत २ रौप्य आणि १ ब्राँझ पदक पटकावले. याच निकषावर अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मालविकाला प्रवेश मिळाला आहे.