दिवाळीत लॉन्च होणार टाटाची ‘हेक्सा’

tata
नवी दिल्ली: अनेक कंपन्या आपल्या नव्या कार या दिवाळीला बाजारात आणत असून यात टाटाचीही क्रॉसओव्हर एसयूव्ही टाटा हेक्सा ही कार देखील या दिवाळीत लॉन्च केली जाणार आहे. ही कार ग्राहकांसाठी दिवाळीच्या दरम्यान ऑक्टोबर महिन्यात उपलब्ध होणार आहे. टाटा आरियाची ही कार जागा घेणार असून ऑटो एक्स्पो २०१६ मध्ये टाटा मोटर्सने हेक्सा ही कार समोर आणली होती. आरिया या कारच्या तुलनेत या नव्या हेक्सामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

आपल्या आकर्षक डिझाईनमुळे हेक्सा ग्राहकांना आकर्षित करणार आहे. तर यातील फिचर्सही आधुनिक देण्यात आले आहेत. हेक्सामध्ये २.२ लीटरचे वेरिकॉर ४०० डिझल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन नुकतेच टाटा सफारी स्टार्मच्या अपडेटेट व्हर्जनमध्येही वापरण्यात आले आहे. या इंजिनसोबत ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे ऑप्शन देखील देण्यात आले आहे. ऑल व्हील ड्राईव्हसोबत सिलेक्टरही दिले आहे.

सर्वात जास्त फिचर्स असलेली टाटा हेक्सा ही कार असणार आहे. यात ऑटो प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी पोजिशन लॅंम्प्स आणि मोठे अलॉय व्हिल देण्यात आले आहेत. तेच कॅबिनमध्ये लेदर अपहोल्स्ट्री डबल सिलाईसोबत देण्यात आले आहे. ही कार ६ सीटर असणार आहे. त्यामुळे ज्यांना फॅमिली कार घ्यायची आहे त्यांच्यासाठी ही कार एक चांगला पर्याय असू शकते. सेफ्टी फिचर्समध्ये ६ एअरबॅग आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्रॅमसोबत टेरेन मॅजेनमेंट सिस्टीमसारखे फंक्शन देण्यात आले आहेत. सस्पेन्शन सेटिंग सुविधेनुसार ऑटोमॅटिक, डायनामिक आणि कम्फर्ट मोडमध्ये सेट केली जाऊ शकते. टाटा या फिचर्सने भरपूर अशा आकर्षक कारची किंमत १३ ते १८ लाख असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment