झारखंड राज्य डोळ्यासमोर आणायचे तर सर्वप्रथम नजरेसमोर येतात ती तेथली दाट अरण्ये आणि विविध समाजाचे आदिवासी बांधव. मात्र झारखंडची एवढीच ओळख नाही कारण या राज्यात अनेक मंदिरेही आहेत व त्यातील दुमका जिल्ह्यातील मलुटी हे गांव तर मंदिरांचे गांव म्हणूनच जगाच्या नकाशावर प्रसिद्धीस येते आहे.
एकापेक्षा एक सुंदर मंदिरांचे गांव मलूटी
या गावाचा राजा मुळचा शेतकरी होता व त्याला राज्यपदाचा लाभ झाला तो सुल्तानाच्या बेगमेमुळे. म्हणजे झाले असे की सुलतान अल्लाऊद्दीन हसन शाह (१४९५ ते १५२५) याच्या बेगमेने पाळलेला एक बहिरी ससाणा उडून गेला. त्याला पकडून तो परत बेगमेकडे सोपविण्याचा पराक्रम वसंत या शेतकर्याने केला व त्यावर खूष झालेल्या सुल्तानाने त्याला मलूटी गांव बक्षीस दिले. बसंतची ओळख बाज बसंत अशी झाली व तेव्हापासून बाज वसंत राजवंशाने या गावाचा कारभार केला. या गावातील बहुतेक मंदिरे याचा राजवंशाने बांधलेली आहेत.
बाज वसंतने या गावात १०८ मंदिरे बांधली. त्यामागचे कारण असे सांगतात की वसंत राजाला महालांपेक्षा मंदिरे बांधण्याची आवड अधिक होती. मंदिरांच्या इतक्या प्रचंड संख्येमुळे या गावाला गुप्त काशी म्हणूनही ओळखले जाऊ लागले. त्यानंतर या गांवात मंदिरे बांधण्याची जणू चढाओढच लागली. आज १०८ मंदिरांपैकी ७२ मंदिरे चांगल्या स्थितीत आहेत. या मंदिरांच्या भिंती महाभारत रामायणातील प्रसंगानी रंगविल्या गेल्या आहेत. एकापेक्षा एक सुंदर अशी ही मंदिरे आहे व त्यातही कालीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. आजही येथे कालीपूजा मोठ्या प्रमाणात केली जाते व रेडा व १०० बकर्या बळी चढविल्या जातात. देश विदेशातील अनेक पर्यटक या गांवाला आवर्जून भेट देतात.