अबब ! १ अब्ज रूपयांचा आयफोन

black
स्मार्टफोन क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता बजेट स्मार्टफोन काढण्यावर अनेक बड्या कंपन्यांनी लक्ष केंद्रीत केले असले तरी आजही महागडे फोन घेण्याची क्रेझ कमी झालेली नाही. त्यात अतिश्रीमंत व्यक्तींसाठी असे महागडे फोन म्हणजे स्टेटस आयकॉन बनत आहेत. स्मार्टफोन महाग असून असून किती असेल असा जर आपला समज असेल तर एक सांगायला हवे की सर्वसामान्यच नव्हे तर बर्‍यापैकी श्रीमंत व्यक्तीही स्वप्नातही घेऊ शकणार नाहीत असे स्मार्टफोन खरेदी केले जात आहेत.

जगातील सर्वाधिक महागडा स्मार्टफोन हा अॅपलचा आयफोन फाईव्ह मॉडेलचा आहे. एका चीनी अब्जाधीशाने आयफोनच्या महागड्या फोनचा डिझायनर स्टुअर्ट ह्यूज याच्याकडून तो बनवून घेतला आहे. ब्लॅक डायमंड या नावाने ओळखला जाणारा हा फोन चक्क १ अब्ज रूपयांचा आहे. हा केवळ दिसण्यात नाही तर फिचर्समध्येही लाजवाब आहे. या फोनसाठी शुद्ध सोने तसेच महागडे व दुर्मिळ ब्लॅक डायमंड वापरले गेले आहेत.

या फोनसाठी ४ इंची रेटिना डिस्प्ले, ८एमपीचा कॅमेरा या फिचर्स आहेतच पण त्याची बॉडी १३५ ग्रॅम वजनाच्या शुद्ध सोन्यात बनविली गेली आहे आणि होम बटणच्या जागी अतिदुर्मिळ असा २६ कॅरेट वजनाचा ब्लॅक डायमंड बसविला गेला आहे. शिवाय ६०० लहान मोठे हिरे त्यात जडविले गेले आहेत. हा फोन हाताने तयार केला गेला व त्यासाठी ९ आठवडे लागले असेही समजते.

Leave a Comment