नाशिकच्या सेंद्रीय भाजीपाल्याचे यशस्वी विपणन

star
मुंबई – कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी कमी करून शेतकऱ्याचा माल कुठेही विकण्याच्या अधिकाराला राज्य शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष आडत आणि दलालांच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांची यातुन मुक्तता झाली आहे.

शासनाच्या याच निर्णयाचा फायदा घेत नाशिक जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येत पिकवण्याबरोबरच विकण्याचेही आता तंत्र आत्मसात केले आहे. कश्यप ऑर्गेनिक या संस्थेची स्थापना करत जिल्ह्यातील ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी सेंद्रीय भाजीपाला लागवड केली. हा भाजीपाला मुंबईच्या सिनेकलाकारांना विकण्यास सुरूवात केली आहे. आमिर खान, जॅकी श्रॉफ, रमेश देव हे स्वत:च या ऑर्गेनिक बँडच्या प्रेमात पडले आहेत. स्वत:च उत्पादन व विपनन करणाऱ्या या शेतकऱ्यांनी ‘शेती परवडत नाही’ या कल्पनेला खोटे ठरविले आहे.

वांद्र्यातील भल्ला हाउसमध्ये हा बाजार भरतो, पण भाजी विक्रेते असतात ते नाशिक जिल्ह्यातील. कुठल्याही रासायनिक खते, पेस्टिसाईड्सचा वापर न करता गोमूत्र, शेणखत, तुळशीचा पाला आणि नैसर्गिक प्रतीरोधकांचा वापर करुन विषमुक्त भाजीपाला ते पिकवितात आणि विकतात.

नाशिक जिल्ह्यातील येवला, नाशिक, दिंडोरी, कळवण, निफाड, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीनशे शेतकऱ्यांनी मिळून सेंद्रीय ग्रुप स्थापन केला असून ते दर रविवारी हा बाजार भरवितात. त्यामुळे या बाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सेंद्रीय भाजीपाल्याचे ‘संडे मार्केट’च विकसित केले आहे.

स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून हे शेतकरी एकत्र आले. त्यातून त्यांनी आपल्या गटाची स्थापना केली. मात्र त्याला संस्थेचे रुप दिले गेलेले नाही. कुणीही मालक, अध्यक्ष किंवा सचिव नाही. केवळ एकमेकांच्या विश्वासावर हा उपक्रम सुरू आहे. इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, निफाड, येवला, चांदवड, मालेगाव, बागलाण, देवळा भागातील शेतकरी दीड हजार एकरावर सेंद्रीय शेतमालाचे उत्पादन घेत आहेत. सिमला मिरची, फ्लॉवर, कोबी, काकडी, मेथी, शेपू, वांगे, कोथंबीर, कांदापात सह 70 प्रकारच्या भाजीपाल्याचा यात समावेश आहे.

सेंद्रीय शेतीच्या एका कार्यक्रमात मुंबईतील उद्योजिका विता मुखी यांच्याशी या शेतकऱ्यांनी ओळख झाली. त्यांनी शेतकऱ्यांनी वांद्रे-पश्चिममधील हिल रोडवरील भल्ला हाऊसमध्ये असलेली पडीत जागा उपलब्ध करुन देत तेथे भाजीविक्री करण्याचा सल्ला दिला. शेतकऱ्यांनी रस्त्यावर इतरत्र भाजीपाला विकण्यापेक्षा एका निश्चित व हक्काच्या जागेवर विक्री करण्यास सुरवात केली. दर रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच या भाजीपाल्याची विक्री केली जाते. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हे दर शनिवारी दीड ते दोन टन भाजीपाला या ठिकाणी नेतात.

शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी व ग्राहकांचा एक प्रतिनिधी असे दोघेजण एकत्र येत भाजीपाल्याचा वर्षभराचा भाव एकाच वेळी निश्चित करतात. मग बाजारात कितीही चढ-उतार झाले तरी हा भाजीपाला निश्चित केलेल्या दरानेच विकला जातो. उदा. टमाटे अन्य बाजारात १० रुपये किलोने मिळत असेल आणि वर्षाचा निर्धारित केलेला दर जर ३० रुपये प्रती किलो असेल तर त्यांना ३० रुपये किलो दरानेच तो ग्राहकांना खरेदी करावा लागेल. तसेच दर जर ६० रुपये किलोवर गेला असेल तरी देखिल ३० रुपये किलोनेच विक्री करावा लागेल असा नियम आहे. शिवाय ग्राहकाला गरजेनुसार भाजीपाला खरेदी करण्याचे स्वातंत्र्य यात असते. म्हणजेच एखाद्या ग्राहकाला जर वांगे एक किंवा अर्धा किलो न घेता त्याला ३ ते ४ वांगेच फक्त घ्यायचे आहे तर तो ते घेऊ शकतो. सर्व भाजीपाला एकत्र केल्यानंतर त्याचे वजन केले जाते आणि त्यानुसार पैसे आकारले जातात.

या शेतकऱ्‍यांनी आपआपल्या भागातील पाण्याची उपलब्धता बघून हवामान आणि नैसर्गिक जमिनीची पोत बघून पिके वाटून घेतली आहेत. इकोसर्ट हे ऑर्गेनिक प्रमाणपत्र घेऊन त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेही उत्पादने विकण्याची परवानगी मिळवली आहे. येथे प्रत्येक आठवड्याला साधारण दीड ते दोन लाखांची विक्री होते. त्यातील १५ ते २० टक्के खर्च वाहनभाडे व शेतकऱ्यांच्या प्रवासावर खर्च होतो. 10 टक्के नुकसान खर्च वजा करून शेतकऱ्यांना उर्वरीत रकमेचे वाटप करण्यात येते.

Leave a Comment