इस्रोकडून ‘स्क्रॅमजेट’ इंजिनाची यशस्वी चाचणी

isro
चेन्नई: अंतरिक्ष अनुसंधान संघटनेच्या वतीने ‘स्क्रॅमजेट’ इंजिनाची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. या इंजिनाच्या वापराने अंतरिक्ष यानाचे वजन निम्म्याने कमी होणार असून वेग आणि कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. ‘स्क्रॅमजेट’ इंजिन विकसित करणारा भारत हा जगातील दुसरा देश ठरला आहे.

रविवारी पहाटे सहा वाजता श्रीहरी कोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रामधून हि चाचणी करण्यात आली. या इंजिनाचा वापर यान वातावरणाच्या कक्षेत असेपर्यंतच होतो. या इंजिनामुळे इंधनात वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिडायझरचे प्रमाण कमी होऊन प्रक्षेपणाच्या खर्चात मोठी बचत होते. ‘स्क्रॅमजेट’ हे स्वनातीत इंजिन असून या इंजिनामुळे यानाला ५ मॅकपेक्षा अधिक वेग प्राप्त होऊ शकतो. या इंजिनमध्ये प्राणवायूचे द्रवीकरण करून तो यानात अथवा जहाजात साठवून ठेवण्याची क्षमता आहे.

‘इस्रो’ने ‘स्क्रॅमजेट’ इंजिनाची चाचणी यशस्वी करून अमेरिकेच्या ‘नासा’शी बरोबरी साधली आहे. ‘नासा’ने सन २००४ मध्ये हि चाचणी घेतली होती. भारतानेही यापूर्वी २००६ मध्ये ‘स्क्रॅमजेट’ इंजिनाचे परीक्षण केले होते. जपान, चीन, रशिया आणि अन्य युरोपीय देश ‘स्क्रॅमजेट’ची चाचणी करण्याच्या प्राथमिक टप्प्यावरच आहेत.

Leave a Comment