निधीवनात दररोज रात्री रंगतो राधा कृष्णाचा रास

nidhi
देशभरात गोकुळअष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. श्रीकृष्णाची कर्मभूमी वृंदावन या पवित्र स्थळी भाविकांनी त्यानिमित्ताने मोठी गर्दी केली होती. याच वृंदावनात निधीवन नावाची एक रहस्यमय जागा भाविकांच्या कुतुहलाचे आणि श्रद्धेचेही स्थान बनून राहिली आहे. अगदी परदेशी पर्यटकांनाही या जागेला भेट देण्याचा मोह आवरता येत नाही. काय आहे येथील रहस्य?

असे मानले जाते दोन अडीच एकरांत पसरलेल्या या भागात आजही दररोज रात्री राधा कृष्ण गोपगोपींसह रास क्रिडा करतात. या ठिकाणी एक रंगमहाल असून तेथे चंदनाचा पलंग, राधेच्या श्रृंगाराचे साहित्य, पाण्याने भरलेला तांब्या, विडा व दातवण म्हणजे दात घासायच्य काड्या ठेवल्या जातात. सायंकाळी सांजआरती केल्यानंतर हा भाग बंद केला जातो. भाविक, पुजारी येथून बाहेर पडतातच पण येथील पशुपक्षीही हा भाग रात्री सोडून जातात.

सूर्योदय झाल्यानंतर जेव्हा रंगमहाल उघडला जातो तेव्हा बिछाना चुरगळलेला दिसतो. पान खाल्लेले असते, पाणी संपलेले असते व दातवणाच्या काड्या चावलेल्या असतात असेही सांगितले जाते. येथील वृक्षही वेगळ्याच प्रकारचे आहेत. म्हणजे त्यांच्या फांद्या खाली झुकलेल्या व एकात एक गुंतलेल्या आहेत. येथे तुळशीची रोपेही जोड रोपे आहेत. असा समज आहे की रात्री याच तुळशीच्या रोपांचे गोप गोपी होतात व सकाळ होताच पुन्हा त्याची रोपे होतात. रात्री या भागात कुणालाही थांबू दिले जात नाही. कुणी लपून राहिलाच तर तो आंधळा, मुका, वेडा होतो असा अनुभव सांगितला जात.

या वनाशेजारी छोटे गाव आहे पण त्या गावातील घरांना या बाजूला खिडक्या नाहीत. ज्या घरांना खिडक्या आहेत, तेही सायंकाळची शेजारती झाल्यानंतर खिडक्या बंद करून घेतात. या गावचे रहिवासी या भागाकडे रात्री पाहातही नाहीत असेही समजते.

Leave a Comment