तुमची व्हाट्सअॅपवरील माहिती वापरणार फेसबूक

combo
नवी दिल्ली: युजर्स डेटा प्रायव्हसीबाबत एक धक्कादायक पाऊल मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅपने उचलले आहे. आता युझर्सची माहिती व्हॉट्सअ‍ॅपने फेसबूकसोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे व्हॉट्सअॅप आता आपला मोबाईल नंबरदेखील फेसबूकसोबत शेअर करणार असल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची डोकेदुखी आता वाढणार आहे. फेसबूकच्या माध्यमातून जास्तीत जास्त जाहिराती व्हॉट्सअॅप युझर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपल्या युझर्सचा डेटा गुप्त ठेवण्यात येईल असा विश्वास व्हाट्सअॅपने नेहमी दिला होता. त्यानुसार युजर्स यावर विश्वास ठेवून आपली बरीच महत्वाची माहिती यावरून शेअर करत होती. फेसबूकने व्हाटस्अॅप विकत घेतल्यावरही युझर्सची माहिती गुप्त ठेवण्यात येईल असा विश्वास देण्यात आला होता. आता मात्र त्यांनी आपल्या धोरणात बदल केला आहे.

फेसबूकला या निर्णयामुळे व्हाट्सअॅप युझर्सचा मोबाईल क्रमांक सहजरित्या मिळणार आहे. याचा अर्थ तुमचा मोबाईल क्रमांक आणि माहिती फेसबूककडे उपलब्ध असणार आहे आणि आता जास्तीत जास्त जाहिराती तुम्हाला पाठवल्या जातील. मात्र, यावर व्हॉट्सअ‍ॅपने खुलासा केला आहे की, फेसबूकशी तुमचा नंबर शेअर केला, तरीही तो अत्यंत सुरक्षीत असेल. व्हॉट्सअॅपच्या मते, मोबाईल नंबर शेअर केल्यामुळे फेसबूक मॅपिंगद्वारे फ्रेन्ड सजेशन आणखी उत्तम होईल. तसेच जास्तीत जास्त जाहिरातीही पोहोचतील. तसेच आमचा व्यवसाय आमच्या करारबद्ध ग्राहकांपर्यंत कसा पोहोचता येईल, याचीही आम्ही चाचपणी करत आहोत, असेही व्हॉट्सअपने म्हटले आहे.

Leave a Comment