११२ वर्षांनंतरही या मंदिराचे काम अपुरेच

mandir
आग्रा येथील ताजमहालाच्या समोर असलेल्या दयाळबागेत गेली ११२ वर्षे सतत सुरू असलेले एका मंदिराचे बांधकाम अजूनही अपुरेच असून येथे आज मजुरांची चौथी पिढी काम करते आहे. सर्वाधिक काळ बांधकाम सुरू असणारे हे मंदिर जगातील एकमेव मंदिर ठरले असून त्याचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी किमान १० वर्षे लागतील असे सांगितले जात आहे.या मंदिराने बांधकामाला लागलेल्या वेळामुळे ताजमहालालालही मागे टाकले आहे. ११२ वर्षात या मंदिराच्या बांधकामावर ४०० कोटी रूपये खर्च झाले आहेत.

राधास्वामी मठाचे प्रथम गुरू पुरूषपुरन धानी महाराज यांची समाधी व मंदिर दयाळबागेत बांधले जात आहे. ही विचारधारा असणारे दोन कोटी लोक जगात आहेत. ताजमहालाप्रमाणेच ५२ विहिरींच्या पायावर या मंदिराचा पाया असून ५० ते ६० फूट खोल विहीरीत दगड टाकून त्या भरून घेतल्या आहेत. मंदिराचा घुमट अशा प्रकारे बांधला जात आहे की भुकंप अथवा वादळाचा परिणाम त्याच्यावर होऊ शकणार नाही. हे बांधकाम १९०४ साली सुरू झाले आहे. याचे डिझाईन १०० वर्षांपूर्वीच इटलीतील एका कंपनीने केले आहे. आजही दररोज २०० मजूर येथे काम करत आहेत. या मंदिराला भेट देणार्‍या भाविकांकडून कोणत्याही प्रकारचे दान घेतले जात नाही. तसेच या बांधकामासाठी कोणतीही सरकारी मदत घेतली गेलेली नाही. या संप्रदायाचे लोक स्वतःच खर्च करून हे मंदिर उभारत आहेत असेही समजते. दरवर्षी यासाठी ७ कोटी रूपये खर्च होत आहे.

Leave a Comment