स्पेक्ट्रम लिलाव पक्षपंधरवड्यामुळे लांबणीवर?

spectrum
दिल्ली- केंद्राकडून २९ सप्टेंबर रोजी केले जाणारे स्पेक्ट्रम लिलाव १ आक्टोबरपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे. यामागे टेलीकॉम कंपन्यांनीच सरकारवर पक्षपंधरवड्यात लिलाव केले जाऊ नयेत असा आग्रह धरला असल्याचे व त्यावर सरकार विचार करत असल्याचे टेलिकॉम सचिव एस. दीपक यांनी सांगितले. टेलिकॉम कंपन्यांवर ३लाख कोटींपेक्षा अधिक रकमेचे कर्ज आहे व त्यामुळे त्या लिलावाबाबत अधिक जागरूक असल्याचेही समजते.

अनंतचतुर्दशी नंतर सुरू होणारा पंधरवडा हा पितृपक्ष म्हणून पाळला जातो व हे दिवस शुभकार्यासाठी चांगले मानले जात नाहीत. कोणतेही शुभकार्य अथवा नवीन कार्याचा प्रारंभ या दिवसांत केला जात नाही. विशेष म्हणजे अत्याधुनिक सेक्टरमधील बड्याबड्या कंपन्या स्थापणारे उद्योजकही पितृपक्ष टाळतात असे समजते. त्याऐवजी १ आक्टोबरला सुरू होत असलेला नवरात्र काळ शुभदायी असल्याने हे लिलाव १ आक्टोबरनंतर केले जावेत असा आग्रहच टेलीकॉम कंपन्यांनी धरला आहे. ऑटो पासून रियल इस्टेट व इलेक्ट्रीक पासून ते ग्राहकोपयोगी वस्तूंपर्यंत सर्व उद्योग क्षेत्रे पितृपक्षात कोणतेही महत्त्वाचे अथवा मोठे काम करत नाहीत असेही समजते.

यंदा केंद्र सरकार सर्व सात बँडची २३५४ एमएचझेड मोबाईल एअरवेवची विक्री एकाचवेळी करणार आहे व त्यामुळे हे लिलाव टेलिकॉम कंपन्यांसाठी महत्त्वाचे आहेत. कांही खास फ्रिक्वेन्सीसाठी मोठ्या बोली लागतील असाही अंदाज दिला जात आहे. यातून सरकारच्या खजिन्यात ५..६ लाख कोटींची भर पडणार आहे.

Leave a Comment