प्रेगन्सीत टाळा ही सौंदर्यप्रसाधने

pregnncy
प्रेगन्सीचा काळ हा महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा व नाजूक संवेदनेचा काळ असतो. या काळात महिला स्वतःबरोबरच पोटात असलेल्या बाळाच्या काळजीने व्याकुळ झालेल्या असतात. अशावेळी सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणार्‍यांनी अत्यंत काळजी घेणे आवश्यक असते असे तज्ञांचे मत आहे. या काळात सौंदर्यप्रसाधनांचा वापर करताना नैसर्गिक प्रसाधनांचा वापर करावा असे आवर्जून सांगितले जाते.

सौंदर्यप्रसाधनांमध्ये रसायनांचा वापर केला गेलेला असतो व त्यातील अनेक रसायने गर्भातील बाळासाठी हानीकारक असतात. बाळाच्या वाढीला या रसायनांमुळे अडथळे निर्माण होऊ शकतात असे स्त्रीरोगतज्ञांचेही मत आहे. उदाहरण द्यायचे तर परफ्युमचे देता येते. परफ्यूम अथवा डिओडरंटमध्ये १०० विविध प्रकारची रसायने असतात व त्याचा गर्भावर नक्कीच वाईट परिणाम होतो.

तीच बाब लिपस्टीक्सची. अ्गदी ब्रांडेड अथवा महागड्या लिपस्टिक खरेदी केल्या तरी त्यात अल्पप्रमाणात का होईना पण लेड म्हणजे शिसाचा वापर केलेला असतो. चहा कॉफी अथवा अन्य पेये घेताना लिपस्टीक पोटात जाऊ शकते व त्याचा गर्भावर विपरित परिणाम होतो. हेअरडाय वापरण्याचे प्रमाणही मोठे आहे. हेअरडायमध्येही कृत्रिम रंग व रसायनांचा वापर असतो.त्याची अनेकदा अॅलर्जी येते वत्याचाही वाईट परिणाम बाळावर होऊ शकतो. हेअरडाय करायचाच असेल तर गरोदरपणाच्या तीन महिन्यानंतर व अगदीच आवश्यक असेल तरच करावा अन्यथा प्रसूतीनंतर करावा.

केसांसाठी वापरले जाणारे शांपूही अनेकदा गर्भातील बाळासाठी धोकादायक ठरतात. कारण त्यात सोडियम सल्फेटचा वापर केलेला असतो. तसेच कृत्रिम सुगंधाचाही वापर मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे अनेकदा त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे, डोकेदुखी असे दुष्परिणाम होऊ शकतात. अॅटीएजिंग प्रसाधनांत रेटेनॉल या रसायनाचा वापर असतो. या रसायनाचेही घातक परिणाम पोटातील बाळावर होऊ शकतात त्यामुळे रेटेनॉलचा वापर असलेले कोणतेही सौंदर्य प्रसाधन प्रेगन्सीत टाळणेच योग्य. याच्या वापराने त्वचा सूर्यप्रकाशासाठी अतिसंवेदनशील बनते असे तज्ञ सांगतात.

Leave a Comment