लवकरच धावणार ‘माथेरानची राणी’

matheran
मुंबई : पुन्हा एकदा ‘माथेरानची राणी’ म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेन मुंबई आणि आसपासच्या पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान येथे सुरू करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मिनी ट्रेन बंद करण्यात येणार अशी चर्चा सुरू होती, मात्र, ही ट्रेन बंद करण्याचा रेल्वेचा कोणताही विचार नसल्याचे मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे पर्यटकांना पुन्हा एकदा या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद लुटता येणार आहे. ही ट्रेन बंद होणार अशा चर्चांमुळे पर्यटकांमध्ये नाराजी पसरली होती.

या मिनी ट्रेनची दोन इंजिन काही दिवसांपूर्वी नेरळ येथून क्रेनच्या सहाय्याने ट्रकमध्ये टाकून नेण्यात आले. त्यानंतर, अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. याबाबत बोलताना हे इंजिन दार्जिलिंग येथे अद्ययावत करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे ही ट्रेन लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती गोयल यांनी दिली.

मिनी ट्रेन बंद होत असल्याचे वृत्त मंगळवारी सर्वत्र पसरले होते. यासंदर्भात मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी सांगितले की, मिनी ट्रेन बंद होत असल्याची माहितीत तथ्य नाही. इंजिन अद्ययावत करण्यासाठी दार्जिलिंगला पाठविण्यात येत आहेत. अद्ययावत तंत्रज्ञान जोडून ती पुन्हा माथेरानला आणली जातील. या आधीही दोन इंजिन तेथील कार्यशाळेत नेण्यात आल्याचे गोयल म्हणाले. त्याचप्रमाणे, या ट्रेनच्या डब्यांमध्येही हवेच्या दाबावर चालणारे ब्रेक बसविण्यात येतील आणि त्याचे काम सुरू आहे. रुळांमधील अडचणी, संरक्षक भिंत अशी काही कामे पूर्ण करून मिनी ट्रेन पुन्हा सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment