मातृत्वाच्या व्यवसायाला अटकाव

suroggacy
नुकताच अवयवदान दिन साजरा करण्यात आला आणि त्या निमित्ताने अवयवदानाच्या पवित्र कामातील व्यावसायिकतेचे गंभीर परिणाम जनतेसमोर आले. अवयवदान करणे हे पुण्याचे काम आहे हे खरे. परंतु या पुण्याच्या कामात पैशाची देवाणघेवाण वाढली आणि चुकीच्या मार्गाने केवळ पैशासाठी किडनीसारखे अवयव देण्याचे प्रकार वाढत गेले. त्यामुळे सरकारने या धंदेवाईकपणाला आळा घालत केवळ परोपकाराच्या भावनेने केले जाणारे अवयवदान वैध मानले जाईल असा दंडक केला. त्यामुळे अवयवदानातील बाजारूपणाला प्रतिबंध बसला. तसाच प्रकार दत्तक मातृत्वाच्या बाबतीत होत होता. दत्तक मातृत्व म्हणजे अपत्यास जन्म देण्यास अपात्र असलेल्या जोडप्याचा फलित झालेला गर्भ एखाद्या महिलेच्या गर्भाशयात वाढवणे आणि त्या बदल्यात तिला पैसे देणे. याला वेगळ्या शब्दात गर्भाशय भाड्याने देणे अशी सोपी संज्ञा दिली गेली आहे. या प्रकारातील फलित गर्भ हा जन्मदात्या मातापित्यांचाच असतो परंतु त्यातील मातेमध्ये ९ महिने गर्भाशयात बाळगण्याची क्षमता नसते. त्यामुळे तो गर्भ अन्य एखाद्या निरोगी महिलेच्या पोटात वाढवला जातो.

एकदा अशा प्रकारे मातृत्व प्राप्त होते हे कळले की परदेशातले विशेषतः अमेरिका आणि युरोपातले मातापिता भारताकडे वळले आणि त्यांनी आपली अपत्ये भारतीय महिलांच्या गर्भाशयात वाढवायला सुरूवात केली. या काळातले गर्भाशयाचे भाडे म्हणून भारतातल्या गरीब महिलांना पैसे दिले जायला लागले. युरोप आणि अमेरिकेत वैद्यकीय सेवा फार महाग आहे. तिथे अशा पध्दतीने म्हणजे सरोगसीच्या पध्दतीने अपत्य प्राप्त करण्यासाठी खूप खर्च येतो. तो खर्च भारतीय चलनात मोजला तर कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. परंतु हाच प्रयोग भारतात केला तर त्याला काही लाख रुपये पुरतात. नेमकेपणाने सांगायचे तर दहा लाख रुपये ही वरची मर्यादा झाली. त्या पलीकडे खर्च येत नाही. त्यातले दोन ते तीन लाख रुपये गर्भाशय भाड्याने देणार्‍या महिलेला मिळतात आणि बाकीचे पैसे डॉक्टर आणि या सर्व व्यवहारात दलाली करणारे दलाल यांना मिळतात. अशी प्राप्ती करण्याची संधी असल्यामुळे भारतात सरोगसीचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर व्हायला लागले आणि अनेक महिलांनी हा व्यवसायच करून टाकला. त्यातून भारतातल्या गरीब महिलांना पैसा मिळतो हे खरे परंतु भारतातल्या आणि परदेशातल्या विवाह विषयक प्रघातांमध्ये बराच फरक असल्यामुळे काही गुंतागुंती निर्माण व्हायला लागल्या. त्यामुळे सरकारला नवा कायदा करावा लागला.

परदेशातून एखादे दाम्पत्य भारतात येते. दहा-पंधरा लाख रुपये खर्च करून सरोगसीच्या माध्यमातून मूल प्राप्त करते परंतु ते मूल घेऊन जेव्हा आपल्या देशात जातात तेव्हा त्यांचा घटस्फोट होतो आणि मुलाचे हाल होतात. त्यांना जर एकत्र नांदायचेच नव्हते तर मूल कशाला हवे होते असा प्रश्‍न निर्माण होतो. काहीवेळा भारतीय महिलेच्या पोटात एखादा गर्भ वाढायला लागतो आणि त्याचा खर्च परदेशी नागरिक करतात कारण ते त्यांचे मूल असते. परंतु जेव्हा मुलाचा जन्म होतो तेव्हा ती मुलगी असल्याचे लक्षात येते तेव्हा त्या मुलीचे आईबाप विश्‍वामित्री पवित्रा धारण करतात आणि ही मुलगी आपल्याला नको असल्याचे सांगतात. दोन ते तीन लाख रुपये एवढे गर्भाशयाचे भाडे मिळावे म्हणून सदर गरीब भारतीय महिला या व्यवहारात गुंतलेली असते परंतु तिने ९ महिने सांभाळलेली मुलगी तिच्या आईवडिलांना नकोशी होते तेव्हा नाईलाजाने या गरीब मातेला ती मुलगी सांभाळणे भाग पडते. अशा अनेक गुंतागुंती असल्यामुळे परदेशी दाम्पत्याला भारतात येऊन सरोगसीच्या पध्दतीने मूल प्राप्त करण्यास केंद्र सरकारच्या नव्या कायद्याने बंदी केली आहे.

भारतातल्या काही विशिष्ट शहरामध्ये हा व्यवसाय फार जोरात सुरू आहे. त्यांचे नुकसान होणार आहे. परंतु या व्यवसायातील बाजारूकरण थांबणार आहे. यापुढे भारतीय दाम्पत्यांना लग्न होऊन पाच वर्षे मूल झाले नाही तर आणि तरच सरोगसीचा वापर करण्यास अनुमती राहणार आहे. त्यांनी पाच वर्षे मूल होण्याची वाट पहावी अशी अपेक्षा आहे. या शिवाय सिंगल पालक, लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारे पती-पत्नी, समलिंगी विवाह करणारे लोक किंवा अविवाहित स्त्री किंवा पुरुष यांना सरोगसीचा वापर करण्यास बंदी राहणार आहे. सरोगेट मदर म्हणून जिच्या गर्भाशयाचा वापर केला जाईल ती महिला मुलाच्या जन्मदात्या मातापित्यांच्या जवळच्या नात्यातली असावी असा सक्त कायदा आता अंमलात येत आहे. त्यातही असे जन्मदाते मातापिता आधीची मुले असतानाही केवळ हौस म्हणून सरोगेट पध्दतीने मुले प्राप्त करत असतील तर त्यांना तशी अनुमती मिळणार नाही. कारण आधीची स्वतःची मुले असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलेचे गर्भाशय भाड्याने घेतले जाणार आहे तिला स्वतःची नैसर्गिकपणे झालेलेली एक किंवा दोन अपत्ये असणे अनिवार्य करण्यात आले आहे. सरोगसीच्या व्यवसायामध्ये बाजारीकरण झालेले होतेच. आता ते कमी होणार आहे. परंतु या कथित बाजारीकरणामुळे भारताला करोडो रुपयांचे परकीय चलन मिळत होते ते आता बुडणार आहे.

Leave a Comment