स्वामींनी केले पटेल यांचे समर्थन

urjit-patel
विदेशी जन्मावरून टीका अयोग्य असल्याचा निर्वाळा
नवी दिल्ली: रिझर्व बँकेचे मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर सतत टीकेची झोड उठविणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गव्हर्नरपदी निवड झालेले उर्जित पटेल यांच्या नियुक्तीचे जाहीर समर्थन केले आहे. पटेल यांची धोरणे राजन यांच्याएवढी आग्रही आणि आक्रमक नसतील; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

पटेल यांचा जन्म केनियामध्ये झाला आहे. त्यावरून ‘विदेशी’चा मुद्दा ट्विटरवर काही जणांनी उपस्थित केला आहे. विदेशात जन्म झाल्याने पटेल यांची शिखर बँकेच्या प्रमुखपदी निवड करण्यास विरोध दर्शविणारे ट्विट काहींनी केले आहे. मात्र त्यांच्याबाबत विदेशात जन्माचा मुद्दा उपस्थित करणे हा तद्दन मूर्खपणा असल्याचे स्वामी यांनी नमूद केले आहे.

पटेल हे देखील सत्ताधाऱ्यांना ना जुमानता आपली धोरणे ठामपणे राबविणारे आक्रमक गव्हर्नर ठरले तर काय असा सवाल करणाऱ्या नेटकरांनाही स्वामी यांनी धारेवर धरले. ‘प्रेस्टिट्यूटस’प्रमाणे मुर्खासारखी विधाने करू नका; असे त्यांनी बजावले आहे. पटेल हे केनियाचे नागरिक होते. आता नाहीत. उलट राजन यांचा जन्म भारतात झाला. ते सॅन २००७ पासून भारतात रहात आहेत. मात्र त्यांनी आपले अमेरिकेचे ग्रीन कार्ड कायम ठेवणे पसंत केले आहे; याकडे स्वामी यांनी लक्ष वेधले.

जनरल सिंग यांचीही पाठराखण

स्वामी यांनी परराष्ट्र राज्यमंत्री आणि निवृत्त लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंग यांचेही समर्थन केले आहे. लष्करप्रमुख असताना जनरल सिंग यांनी शस्त्रास्त्र खरेदीतील घोटाळा बाहेर काढला. त्यांच्याच कार्यकाळात ‘आदर्श’ घोटाळा आणि सुकमा जमीन घोटाळा उघडकीला आला. त्यामुळे काही अधिकारी पैसे खाऊन त्यांच्या विरोधात आघाडी उघडू पहात आहेत. अशावेळी सरकारने जनरल सिंग यांची पाठराखण करावी; अशी अपेक्षाही स्वामी यांनी व्यक्त केली. जनरल सिंग यांनी आपली बढती रोखण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करणारे शपथपत्र विद्यमान लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी सादर केले आहे. या शपथपत्राबद्दल स्वामी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Leave a Comment