सोशल मीडियासाठी सुषमा स्वराज रोज दोन तास देतात

sushma-swaraj
नवी दिल्ली – ट्विटरमुळे कायमच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या चर्चेत असतात. त्यांच्यापुढे ट्विटरच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या विविध प्रश्नांना आणि अडचणींना त्या लगेचच उत्तर देतात किंवा तो प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देतात.

त्यांचा ट्विटरवरील प्रतिसाद हा कायमच सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय ठरतो. पण सुषमा स्वराज यांच्या बाबतीत एक नवीनच माहिती त्यांच्या मंत्रालयातील प्रवक्त्याने दिली. रोज दोन तास फक्त सुषमा स्वराज या सोशल मीडियासाठी देत असतात. त्याचबरोबर विविध देशात असलेल्या भारताच्या राजदूतांना आणि उच्चायुक्तांनाही त्यांनी सोशल मीडियाला जास्तीत जास्त वेळ देण्याची सूचना केली आहे.

या माध्यमातून नागरिकांकडून मांडण्यात येणारे प्रश्न थेट संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि त्यावर उत्तरही मिळते, यामुळे या माध्यमाचा योग्य वापर करावा, यासाठी सुषमा स्वराज आग्रही आहेत. त्या स्वतः स्वतःचे ट्विटर हॅंडल वापरतात आणि नागरिकांकडून त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित प्रश्नांना स्वतःच उत्तर देतात. केवळ सोशल मीडियाच नव्हे, तर सुषमा स्वराज रोज वेगवेगळ्या लोकांना भेट देतात आणि त्यांचे प्रश्न समजून घेतात, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Comment