स्टेट बँकेमध्ये सहयोगी बँकाच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु

sbi
नवी दिल्ली: आपल्या सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेसोबतच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला भारतीय स्टेट बँकेने औपचारिक स्वरूपात मंजूरी दिली असून शेअर्सच्या अदलाबदलीचे प्रमाणही निश्चित करण्यात आले आहे.

हा निर्णय गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासोबतच या बँकांच्या शेअर्सच्या अदलाबदलीचे प्रमाणही निश्चित करण्यात आले.
त्यानुसार स्टेट बँक ऑफ बिकानेर अॅन्ड जयपूरचे १० शेअरच्या बदल्यात स्टेट बँकेचे २८ शेअर मिळणार आहेत. स्टेट बँक ऑफ म्हैसूरच्या १० शेअरच्या बदल्यात स्टेट बँकेचे २२ शेअर मिळतील. स्टेट बँक ऑफ त्रावणकोरच्या १० शेअरच्या बदल्यात भारतीय स्टेट बँकेचे २२ शेअर मिळणार आहेत. याशिवाय भारतीय महिला बँकेच्या १ कोटी शेअरच्या तुलनेत महिला बँकेच्या ४ कोटी ४२ लाख ३१ हजार ५१० शेअर देण्यात येतील. इतर दोन सहकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ हैदराबादचे शेअर्सची विक्री स्टॉक एक्सचेंजमध्ये होत नसल्याने, त्याच्या शेअरच्या अदला-बदलीचे प्रमाण सार्वजनिक करण्यात आले नाही.

१५ जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने स्टेट बँकेसोबत त्यांच्या पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेच्या विलिनीकरणाला तत्त्वत: मान्यता दिली होती. एसबीआयला ३१ मार्च २०१७चे अर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी ही विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या विलिनीकरणामुळे भारतीय स्टेट बँक देशातील सर्वात मोठी बँक बनेल.

Leave a Comment