म्युच्युअल फंडांनी घटविली बँकांमधील गुंतवणूक

mutual-funds
मुंबई: देशातील बँकांमध्ये कर्ज थकबाकी आणि अनुत्पादक खात्यांचे (एनपीए) वाढते प्रमाण लक्षात घेऊन म्युच्युअल फंडांनी बँकांमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण उल्लेखनीयरित्या घटले आहे. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा अवाढव्य आकार लक्षात घेता इतर क्षेत्रांच्या मानाने या फंडांच्या बँकांमधील गुंतवणुकीचे प्रमाण इतर क्षेत्रांपेक्षा अधिक राहील; असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.

बँकांची नियामक संस्था असलेल्या ‘सेबी’कडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार जून महिन्यात म्युच्युअल फंडांची बँकांमधील गुंतवणूक २०. ४ टक्के होती; तर जुलै महिन्यात त्यामध्ये घट होऊन हे प्रमाण १९. ८६ टक्क्यांवर आले आहे. या महिन्यात म्युच्युअल फंडांनी बँकामध्ये ८२ हजार ४२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हीच गुंतवणूक जूनमध्ये ९३ हजार ८८५ कोटी एवढी होती.

बँकांमधील कर्जाच्या थकबाकीचे प्रमाण गंभीर असल्याची जाणीव रिझर्व बँकेने वेळोवेळी करून दिली आहे. ‘एनपीए’चे प्रमाण कमी करून सेवांचा दर्जा न वाढविल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही शिखर बँकेने यापूर्वीच दिला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर बँकींग क्षेत्रातील म्युच्युअल फंडांची गुंतवणूक कमी झाली असली तरीही फंड व्यवस्थापकांसाठी बँकींग क्षेत्रातील गुंतवणूक हीच अजूनही पहिली पसंती आहे. बँकींगनंतर औषध उत्पादक कंपन्यांमधील गुंतवणूक व्यवस्थापकांना विश्वासार्ह वाटते. त्यानंतर वाहन उद्योग व अन्य क्षेत्रांचा समावेश होतो.

Leave a Comment