हत्तींच्या पिलांना मिळते आजीची माया

elephant
ज्यांचे बालपण आजीसोबत गेले असेल त्या नातवंडांना आजीची माया म्हणजे काय याची पुरेपूर जाण असते. आजी आपल्या या नातवंडांची किती काळजी घेते, किती माया करते हे सांगता येणार नाही. मात्र आजीची माया ही फक्त माणसाची मक्तेदारी नाही. प्राणीजगात आजीची माया वगैरे कांही प्रकार असण्याची शक्यता अगदीच कमी. कारण प्राणी कधीच कुटुंब करून राहात नाहीत तसेच नातवंडे सांभाळण्याएवढे त्यांचे आयुष्यही नसते. अर्थात हत्ती याला अपवाद ठरले आहेत. हत्तीच्या पिलाना आजीची माया भरपूर मिळते असे प्रो. फिलीस ली यांनी हत्तींवर गेली ४० वर्षे केलेल्या संशोधनातून दिसून आले आहे.

ली यांनी केनियातील अँबोस्ली राष्ट्रीय पार्कमधील ८०० हत्तींचे गेली ४० वर्षे अध्ययन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हत्तीच्या झुंडीत बाळ हत्तीचे जगणे हे आजी असण्यावर बरेचसे अवलंबून असते. हत्तीच्या कळपात सर्वात वयोवृद्ध हत्तीण मुखिया असते. सर्व कळपाच्या खाण्यापिण्यासाठी ती शोध घेत असतेच तसेच दुसर्‍या कळपाचे हत्ती अंगावर धावले तर प्रतिकारासाठी सज्ज असते. सर्व कळपावर तिची देखरेख असतेच पण विशेषतः नातवंड हत्तींसाठी ती अधिक जागरूक असते. ज्या कळपात मुखिया हत्तीण आहे तेथे हत्तींचे प्रजननही अधिक संख्येने होते असेही दिसून आले आहे.

कळपातील नातवंडांच्या रक्षणाची पूर्ण काळजी ही आजी घेते. त्यांच्यावर लक्ष ठेवणे, रस्त्यातील अडथळे त्यांच्यासाठी दूर करणे, सर्वात प्रथम या लहान बाळांना खायला देणे अशी काळजी ती घेते. हत्ती तसाही समजूतदार प्राणी आहे असेही ली यांचे म्हणणे आहे.