पीएफ तारण ठेवून करू शकता घर खरेदी !

epfo
नवी दिल्ली – पगारातून पीएफ कपात होणाऱ्या नोकरदारांचे घर खरेदीचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. भविष्य निर्वाह निधी खात्यात (पीएफ) जमा असलेली बचत घराचे कर्ज फेडण्यासाठी कामी येईल. म्हणजेच स्वस्त घर खरेदी व त्याचा ईएमआय फेडण्यासाठीही ईपीएफओ खात्याचा वापर करता येईल.

लवकरच अशी योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (ईपीएफओ) आणणार आहे. त्याअंतर्गत ईपीएफओ सदस्यांना स्वस्तातील घर खरेदी करण्यासाठी आपली पीएफ बचत तारण ठेवता येईल. सोबतच घराचा ईएमआय फेडण्यासाठीही पीएफ खाते वापरले जाऊ शकेल. कामगार सचिव शंकर अग्रवाल यांनी सांगितले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या खातेधारकांसाठी गृहयोजना तयार करत आहे.

कामगार सचिव शंकर अग्रवाल म्हणाले, आम्हाला सदस्यांवर काहीही लादायचे नाही. यामुळे आम्ही त्यांच्यासाठी जमीन घेणार नाही, घरे बनवूनही देणार नाही. त्यांना खुल्या बाजारातून पसंतीचे घर घेता येईल. हा प्रस्ताव मंजुरीसाठी ईपीएफओ ट्रस्टीजच्या (सीबीटी) पुढील बैठकीत मांडला जाईल. त्यात सदस्य किती रकमेच्या कर्जासाठी पात्र असतील, स्वस्त घरांचे निकष काय असतील हे महत्त्वाचे मुद्दे ठरवण्याचे बाकी आहे. सीबीटीची परवानगी मिळाल्यानंतर ही योजना उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment