लंडन – आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात काहीही बोललो तरी बवाल होऊ शकतो, असे नवे वादग्रस्त वक्तव्य रिझर्व्ह बँकेचे मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. गेल्या दोन वर्षात राजन यांनी अनेकदा सरकारविरोधात अप्रत्यक्ष टिकात्मक विधाने करून वाद ओढवून घेतला आहे.
मोदींवर काहीही बोललो तर ‘बवाल’ होईल
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना मोदींबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी आपण हा प्रश्न सोडून देत आहोत. कारण या विषयावर मी कोणतेही भाष्य केले, तरी ते अडचणीचेच होईल. त्यामुळे मौन बाळगणेच आपण पसंत करू, अशी सावध भूमिका त्यांनी घेतली. पण त्यांच्या या विधानामुळेही नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
४ सप्टेंबरला राजन हे निवृत्त होत आहेत. मोदी सरकारने त्यांना कार्यकाळवाढ दिली नाही, म्हणून काही विचारवंतांनी सरकारला दोष दिला होता. तथापि, सरकारने त्याला दाद दिली नाही. आता येत्या तीन-चार आठवडय़ांमध्ये नव्या गव्हर्नरांची निवड करण्यात येणार आहे.